सोनोली पुलाचे काम रखडले
सर्व्हिस रस्ता खचल्याने वाहतुकीला धोका
वार्ताहर/तुडये
राकसकोप-बेळगाव मुख्य रस्त्यातील सोनोली गावाजवळील नाल्यावरील जून महिन्यात उभारण्यात आलेल्या पुलाचे काम रखडल्याने मागील सात महिने या मार्गावरील वाहतूकही धोकादायक अशा सर्व्हिस रस्त्यावरून सुरू आहे. या पुलाची नव्याने उभारणी करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटदाराने पुलाची उभारणी जून महिन्यापर्यंत जोमाने केले. स्लॅब घातल्यानंतर मात्र काम पूर्णपणे थांबले आहे. त्यानंतर कंत्राटदाराने या कामाकडे फिरकूनही पाहिले नाही. पूल उभारणीवेळी तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रस्त्याची खड्डे आणि चरीमुळे वाताहत झाली आहे. सध्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनांची रस्त्यावर गर्दी वाढली आहे. या सर्व्हिस रोडवरून ऊस वाहतुकीची वाहने घालणे धोक्याचे बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बेळगावच्या अधिकाऱ्यांनीही या पुलाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार काय, असा सवाल वाहनधारकांतून करण्यात येत आहे. तरी या पुलाचे रखडलेले काम पूर्ण करून पूल वाहतुकीला खुला करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.