“आठ दिवसांत कसई-दोडामार्ग गार्डनचे काम सुरू करा, अन्यथा उपोषण!” नगरसेविका सोनल म्हावळंकर यांचा प्रशासनाला इशारा
निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व्हे क्रमांक 44/1/10 मधील खुल्या जागेत गार्डन विकसित करण्याच्या कामाला 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, मान्यता मिळून अनेक महिने उलटूनही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे या कामाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, या गार्डनच्या कामाला मान्यता मिळाल्यानंतर मंजूर झालेली इतर विकासकामे पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना प्रभाग क्रमांक 5 मधील काम मात्र रखडले आहे. त्यामुळे आपल्या प्रभागावर अन्याय होत असल्याची भावना नगरसेविका म्हावळंकर यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
प्रभागातील नागरिकांना गार्डनसारखी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने पुढील आठ दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू न केल्यास 2 नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.
आता नगरसेविका सोनल म्हावळंकर यांच्या निवेदनाची दखल घेऊन नगरपंचायत प्रशासन या कामाला सुरुवात करण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.