माफिया डॉन रहमान डकैतच्या पुत्राला अटक
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानच्या कराचीमध्ये गँगस्टर रहमान डकैतच्या पुत्राला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. ल्यारीच्या क्रूर अंडरवर्ल्डशी संबंधित या नावाने पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळविले आहे. रहमान डकैतचा पुत्र जिब्रानला अवैध पिस्तुलसोबत अटक करण्यात आली आहे. कलाकोट पोलिसांनी जिब्रानला ताब्यात घेतले आहे. जिब्रान हा अब्दुल रहमान उर्फ रहमान डकैतचा पुत्र असून तो गुन्हेजगतात दीर्घकाळापासून सक्रीय असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जिब्रान विरोधात ल्यारीच्या कलाकोट पोलीस स्थानकात 2023-24 दरम्यान दोन गुन्हे नोंद झाले होते. तो अमली पदार्थांची तस्करी, खंडणीसाठी अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील राहिला आहे. ल्यारी येथे गुन्हेगारांची एक टोळी उभी करण्यासाठी तो प्रयत्नशील होता असा दावा पोलिसांनी केला आहे.
भीतीदायक इतिहास
रहमान डकैत हे ल्यारीच्या टोळीयुद्धातील मोठे नाव होते. तो 80 पेक्षा अधिक गुन्ह्यांमध्ये सामील होता आणि ल्यारीच्या टोळीयुद्धाचा केंद्र राहिला होता. 2009 मध्ये कराची पोलिसांनी रहमान डकैत आणि त्याच्या तीन साथीदारांना कंठस्नान घातले होते. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर त्याच्या परिवाराचे सदस्यही गुन्हेजगतात सक्रीय होते. 2024 मध्ये रहमानचा एक पुत्र एका चकमकीत मारला गेला होता.