एमी जॅक्सनला पुत्ररत्न
मुलाचे नाव केले उघड
ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल एमी जॅक्सन दुसऱ्यांदा आई झाली आहे. हिंदीसोबत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेल्या एमीने सोशल मीडियावर मुलाची पहिली झलक दाखविली आहे. त्याचे नाव देखील उघड करण्यात आले आहे. एमीला पहिल्या जोडीदारापासून देखील एक मुलगा आहे. एमी जॅक्सनने स्वत:चा पार्टनर एड वेस्टविकसोबतची छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये त्यांचा नवजात पुत्रही दिसून येतो. या पुत्राचे नाव ऑस्कर अलेक्जेंडर वेस्टविक ठेवण्यात आले आहे.
एमी ही अक्षय कुमारसोबत ‘सिंह इज ब्लिंग’, रजनीकांत यांच्यासोबत ‘2.0’, तर प्रतीक बब्बरसोबत ‘एक दीवाना था’ या चित्रपटात दिसून आली होती. एमीने प्रतीकला डेट केले होते. परंतु काही कारणास्तव दोघांच्या नात्यात दुरावा आला होता. एमी ही 2011-15 पर्यंत मुंबईत वास्तव्यास होती, परंतु त्यानंतर ती लंडनमध्ये स्थायिक झाली.
एमीने हॉटेलियर जॉर्ज पनायिओटूला डेट केले होते. 2019 मध्ये झाम्बिया येथे दोघांची एंगेजमेंट झाली होती. तर एमीने सप्टेंबर 2019 मध्ये पुत्राला जन्म दिला होता, परंतु 2021 मध्ये एमी आणि जॉर्ज यांचा ब्रेकअप झाला होता. 2022 मध्ये एमीने इंग्लिश अभिनेता एड वेस्टविकला डेट करण्यास सुरू केले. ऑगस्ट 2024 मध्ये दोघांनी विवाह केला होता. आता या दांपत्याच्या आयुष्यात एका पुत्राची एंट्री झाली आहे.