जावयाने केला सासूचा खून
चाकूने भोसकले : रयत गल्ली वडगाव येथील घटना, तिघांना अटक
बेळगाव : लेकीच्या उपचारासाठी बिलापोटी दवाखान्यात भरलेले तीन हजार रुपये मागण्यासाठी आलेल्या सासूचा जावयाने चाकूने भोसकून निर्घृण खून केला. मंगळवारी सकाळी 11.40 च्या सुमारास रयत गल्ली, वडगाव येथे ही घटना घडली असून खून झालेल्या महिलेचे रेणुका श्रीधर पाडमुखे (वय 43, रा. कल्याणनगर, वडगाव) असे नाव आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी जावयासह तिघांना अटक केली आहे. शुभम दत्ता बिर्जे (24 मूळचे रा. मारुती गल्ली, खासबाग सध्या रा. रयत गल्ली वडगाव), त्याचे वडील दत्ता मल्लाप्पा बिर्जे (50) आणि आई सुजाता दत्ता बिर्जे (44, दोघेही रा. मारुती गल्ली, खासबाग) अशी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांतून समजलेली माहिती अशी, आरोपी शुभमने मयत रेणुका यांची मुलगी छाया हिच्यासोबत सात महिन्यांपूर्वी उपनोंदणी कार्यालयात विवाह केला. त्यानंतर तो आपल्या पत्नीसोबत रयत गल्ली येथे भाड्याच्या घरात रहात होता. विवाहानंतर शुभम पत्नीसोबत वारंवार भांडण, तंटा काढत होता. त्यातच ती गेल्या तीन दिवसांपासून आजारी झाली होती. पण तिची पतीसह सासू आणि सासऱ्यांनी काळजी घेतली नाही. त्यामुळे आई रेणुका यांनी छायाला दवाखान्यात दाखविले. त्यावेळी उपचारासाठी आलेले तीन हजार रुपयांचे बिल रेणुका यांनी दवाखान्यात भरले होते. सदर बिलाची रक्कम मागण्यासाठी त्या मंगळवारी रयत गल्ली येथील लेकीच्या घरी आल्या होत्या. जावयाकडे बिलापोटी भरलेले तीन हजार रुपये देण्याची मागणी केली असता वरील तिघांनी रेणुका यांच्याशी भांडण काढले.
त्यावेळी हाताने मारहाण करण्यासह तिला जिवंत सोडू नकोस अशी चितावणी आई, वडिलांनी मुलाला दिली. त्यामुळे रागाच्या भरात शुभमने घरातील चाकू घेऊन सासूच्या पोटात भोसकला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांनी भेट देऊन पाहणी केली. तर शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेऊन पंचनामा केला. मयत रेणुका यांची मुलगी छाया हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेत तिघांना अटक केली. संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.
संक्रांतीदिवशीच खून झाल्याने खळबळ
मुलीच्या दवाखान्यासाठी खर्च केलेले तीन हजार रुपये मागण्यासाठी रेणुका संक्रांती दिवशीच रयत गल्ली येथील जावई राहात असलेल्या घरी गेल्या होत्या. मात्र जावई व त्याच्या आई, वडिलांनी रेणुका यांच्याशी भांडण काढून त्यांचा खून केला. त्यामुळे ऐन संक्रांतीच्या सणातच खुनाची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली.