For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन् जावयाने केला सासूवर चाकू हल्ला

03:29 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन् जावयाने केला सासूवर चाकू हल्ला
Advertisement

कौटुंबिक वादातून आलदकट्टी गावात घडली घटना : जावयाला केली पोलिसांनी अटक

Advertisement

बेळगाव : व्हिडिओ कॉलवर पत्नीने मुलाला न दाखविल्याने रागाच्या भरात सासरी आलेल्या जावयाने सासूवर चाकू हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या व्हॉट्सअॅपवर जावयाने आज जेल उद्या बेल... मात्र सोडण्याची गोष्ट नाही, आठवण ठेव. वेट अँड सी, असा स्टेटस ठेवला. ही धक्कादायक घटना आलदकट्टी, ता. यरगट्टी गावात 2 मे रोजी घडली असून यरगट्टी पोलिसांनी आरोपीला अटक केली. अरविंद महादेवप्पा गवळी (वय 26, रा. मंटुर, ता. हुबळी, जि. धारवाड) असे त्याचे नाव आहे.

महादेवी रायाप्पा करीगार (वय 45, रा. आलदकट्टी, ता. यरगट्टी) असे जखमी सासूचे नाव असून तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, आरोपी अरविंदचा विवाह गेल्या दोन वर्षांपूर्वी जखमी महादेवी यांची मुलगी कल्पना सोबत झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी कल्पनाची प्रसूती झाली असून तिला मुलगा झाला आहे. त्यामुळे ती माहेरी रहायला गेली आहे. तेव्हापासून आरोपी पत्नीला वारंवार व्हिडिओ कॉल करून माझ्या मुलाला दाखव, असे म्हणत होता.

Advertisement

सातत्याने व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखविल्यानंतर हात दुखू लागल्याने कल्पनाने फोन खाली ठेवला. त्यामुळे आरोपी पतीला राग आला. माझ्या मुलाला मला दाखवताना तुझा हात दुखतो, असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली. त्यावेळी सासू महादेवी यांनी आम्हाला का शिविगाळ करतोस, आम्ही काय चूक केली आहे, असे का करत आहेस, असे म्हटले. त्यामुळे तिकडे आलो तर तुला खल्लास करतो, असे रागाच्या भरात त्याने म्हटले. त्याच दिवशी म्हणजेच 2 मे रोजी 5.30 च्या दरम्यान आरोपी सासरवाडीला गेला.

त्या ठिकाणी सासूला अश्लील शब्दात शिवीगाळ करून, फोनवर फार बोलत होतीस, आता समोर आहे, काय करतेस करून घे. आता तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत आरोपीने सासूचा खून करण्याच्या उद्देशाने चाकू महादेवी यांच्या पोटात खूपसला. चाकूहल्ला केल्यानंतर आरडाओरड करण्यात आल्याने आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. लागलीच जखमीला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले. घटनेची माहिती समजताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. काही वेळानंतर हल्लेखोर जावयाला अटक केली. या प्रकरणी मुरगोड पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक वाय. एच. यादवाड पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Tags :

.