शेजाऱ्याचे आईबरोबर अनैतिक संबंध असल्याचे खटकत होते; मुलाने थेट मित्राच्या मदतीने काढला प्रियकराचा काटा
कराड: आईबरोबर असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून तिच्या प्रियकराचा मुलाने मित्राच्या मदतीने डोक्यात व शरीरावर कोयत्याने वार करून त्याचा निघृण खून केला. ही घटना मलकापुरातील लाहोटीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घडली. खून करून संशयित आरोपींनी पलायन केले होते. मात्र, डीबी पथकाने सातारा येथून संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन कोयते व एक चार चाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सुनील नाथा चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर सूरज दीपक चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) व त्याचा मित्र अक्षय सुरेश म्हेत्रे (रा. कोरेगाव, ता. सातारा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित सूरज चव्हाण याच्या आईबरोबर मयत सुनील चव्हाण याचे गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबध होते. दोघेही एकाच गावातील घराशेजारी राहणारे होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती घरातील लोकांना समजल्यानंतर संबंधित महिलेला दुसऱ्या गावी ठेवले होते.
आपल्या आईबरोबर सुनील याचे संबंध असल्याचे मुलाला खटकत होते. त्याचाच राग मनात धरून मुलगा सूरज चव्हाण याने मित्राच्या साथीने सुनीलला लाहोटीनगर येथील सर्व्हिस रस्त्यावर थांबवून त्याच्या डोक्यात व शरीरावर कोयत्याने वार करून निघृण खून केला.