Crime News : मित्रांसोबतचा 'तो' क्षण ठरला अखेरचा, पोहायला गेलेल्या युवकाचा तळ्यात बुडून मृत्यू
यावेळी पोहताना अचानक तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला
रत्नागिरी : तालुक्यातील सोमश्वर येथील तळ्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. आदेश दत्ताराम घडशी (17, रा. देवरुख-खालची आळी) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
आदेश हा सोमवारी आपल्या मित्रांसोबत तालुक्यातील सोमेश्वर तळे याठिकाणी आला होता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आदेश हा तळ्यामध्ये पोहण्यास उतरला. यावेळी पोहताना अचानक तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. आदेश पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर स्थानिकांनी आदेशला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्यी.
तोपर्यंत आदेश हा पाण्याच्या तळाशी जाऊन पोहचला होता. सोमेश्वर येथील स्थानिक तरुणांनी आदेशला पाण्यातून बाहेर काढले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या आदेश याला उपचारासाठी तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आदेशला तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. त्याच्या अकाली जाण्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.