उजळणी परीक्षेत काही शाळांचा शून्य टक्के निकाल
शहरांसह ग्रामीण भागातील अवस्था : जिल्ह्यातील 23 शाळांना कारणे दाखवा नोटीस
बेळगाव : उजळणी परीक्षेत बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील काही शाळांचा धक्कादायक निकाल लागला आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील काही शाळांचे सर्वच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण खात्यानेही आता शाळांसमोर हात टेकले असून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दहावीच्या निकाल वाढीसाठी जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्या प्रयत्नातून अनेक उपक्रम राबविण्यात आले. अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांना जादा शिकवणी घेण्यात आली. परंतु तरीदेखील उजळणी परीक्षेचा निकाल कमी लागला.
काही शाळांमध्ये तर एकही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्ह्यातील 23 शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. केवळ ग्रामीण भागातच नाही तर बेळगाव शहरातील काही शाळांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. ही धक्कादायक बाब असून शहरातच ही परिस्थिती असेल तर ग्रामीण भागाचा विचार न केलेला बरा. सर्व सुविधा उपलब्ध असतानाही निकाल वाढत नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. किमान पुढील परीक्षांमध्येही निकाल वाढावा या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
उजळणी परीक्षेचे गुण जमा करण्याची सूचना
दहावीची उजळणी परीक्षा-2 काही दिवसांपूर्वीच घेण्यात आली. दहावी मुख्य परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचे गांभीर्य समजावे हा त्यामागचा उद्देश होता. उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असल्याने शिक्षण विभागाने परीक्षेचे गुण ऑनलाईन शिक्षण विभागाकडे जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांमधून विद्यार्थ्यांचे गुण अपलोड करण्याची तयारी केली जात आहे.