पूरग्रस्तांना थोडा दिलासा
महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झालेल्या शेतकरी, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयांचे आतापर्यंतचे सर्वात मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. दिवाळीच्या आधी ही मदत देण्यात येईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा यांनी पूरग्रस्तांना दिलासाच दिला आहे, शासन तूमच्या सोबत आहे असा एक विश्वास त्यातून व्यक्त झाला आहे. पूरस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडल्याने तो मदतीच्या प्रतीक्षेत आहे. अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे व 253 तालुक्यांना फटका बसला असून 68 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. आभाळ फाटलं तर कसे शिवायचे या उक्तीचा तडाखा महाराष्ट्राला आणि त्यात जास्त करुन मराठवाड्याला बसला. गेल्या 50 किंवा शंभर वर्षात झाला नाही असा पाऊस कोसळला, हाता तोंडाशी आलेले खरीप पिक वाया गेले. आधीच दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि त्यात हा न भुतो तडाखा त्यामुळे बळीराजा पेकाट मोडल्यासारखा कोलमडला. गेल्या वर्षभरात कर्जबाजारीपणा आणि शेतातलं पिक पदरी पडेना म्हणून मराठवाड्यातील आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशी भयाण परिस्थिती असताना हा नवा तडाखा सहन न होणारा होता. समोर दसरा दिवाळी रब्बी हंगाम आणि थकीत कर्ज सारा अंधार होता, शासनाच्या तिजोरीत खडखडाट आहे, लाडकी बहिण असो वा कारण काहीही असो पैशाची चणचण होती, आहे अशा परीक्षेच्या काळात देवाभाऊचे सरकार मैदानात उतरले, सारे मंत्री राज्यभर हिंडले आणि शक्य ती सर्व मदत करत
पूरग्रस्तांसाठी आजवरचे विक्रमी पॅकेज आता देऊ केले आहे. या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी देऊ असे म्हटले होते. त्यामुळे विरोधीपक्ष सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करत, आंदोलने करु लागला आहे. या अतिवृष्टीमुळे 60 हजार शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली असून त्यांना माती आणण्यासाठी राज्य सरकार 47 हजार रुपये, तर ‘नरेगा’अंतर्गत 3 लाख असे एकूण हेक्टरी 3 लाख 47 हजार रुपये रोख पैसे देण्यात येणार आहेत. तसेच बाधित झालेल्या प्रत्येक विहिरीतील गाळ काढण्यासाठी 30 हजार रुपये देण्यात येणार आहेत. दूधाळ जनावरे, कोंबड्या यासाठीही भरपाई आहे. एकूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कोणत्याही कागदपत्रांची तपासणी न करता, थेट बँक खात्यात ही मदत जमा होणार आहे. एकूणच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान, घरांची पडझड, जमीन खरडून गेली, दुकानदार, गोठ्याचे नुकसान, जनावरे दगावली. अतिवृष्टीमुळे 1 कोटी 43 लाख 52 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. असे अनेक पदर या नुकसानीला आहेत. अनेक जण दगावले असून घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे याला प्राधान्य देण्यात आले असून घरांची पडझड झाली, पुराचे पाणी घरात शिरले अशा लोकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 10 हजार रुपयांची आर्थिक मदत तातडीने देण्यात आली आहे. तसेच 2,215 कोटी रुपयांची मदत याआधीच जाहीर केली आहे. गहू तांदूळ, अन्नधान्याचे पॅकेटचे वाटप करण्यात आले असून शेतकऱ्यांना उभे करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे घरांची पूर्णत: पडझड झाली असेल तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नव्याने घरांची बांधणी करुन देण्यात येणार आहे. डोंगर भागातील घरांची पडझड झालेल्यांना 10 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा 29 जिह्यांना बसला असून परभणी, वाशिम, जालना, यवतमाळ या जिह्यात 50 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. तर संभाजीनगरमध्ये 75 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. तसेच सोलापूर धाराशिवमध्ये 80 टक्क्यांहून अधिकचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या शेतकऱ्यांना आधार देणं, उभं करणं आणि रब्बी हंगाम यशस्वी व्हावा यासाठी प्रथम पावलं टाकणं हे धोरण सरकारने स्वीकारले आहे आणि कर्जमाफीचा शब्द योग्य वेळी पूरा करु असे म्हटले आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका लगेचच आहेत. दिवाळी संपताच त्या जाहीर होतील. त्यामुळे संकटात राजकारण नको म्हटले तरी राजकारण होणारच आणि ते सुरूही झाले आहे. उद्वव ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील, वडट्टीवार, सुप्रिया सुळे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी सरकारला घेरायला सुरवात केली आहे आणि सरकारही निवडणूक तोंडासमोर ठेवून 10 हजार तातडीची मदत बाधित लाभार्थी खात्यात दिवाळीपूर्वी भरणार आहे. राज्य सरकारने भव्य पॅकेज जाहीर करुनच नव्या मुंबईत विमानतळ उद्घाटनासाठी आणि मुंबई मेट्रोच्या चौथ्या टप्प्यांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात पाचारण केले आहे. राजकारण चालतच राहणार पण असे संकट येते, जनजीवन अडचणीत येते त्यावेळी सारे संकुचित विचार मागे टाकून अडचणीतील भाऊबंधांना मदतीचा हात दिला पाहिजे. जितका मोठा पाऊस आला, महापूर आला, त्यापेक्षा मोठा मदतीचा महापूर आला पाहिजे. माणूसकी चमकून उठली पाहिजे हीच ती वेळ आहे ‘गाव करेल ते राव काय करेल’ हे सिद्ध करण्याची सरकारी पातळीवर मदत, पूर्नवसन, रस्ते, जमीन सुधारणा, शैक्षणिक सुविधा फी माफी, रेशन, रब्बीसाठी बीबियाणे आदी गोष्टी होतील पण अन्य सर्वांनी ज्यांना शक्य आहे, ज्यांना आठवे वेतन मिळते, मोठा बोनस मिळतो, अशा सर्वांनी दिवाळीचा एक दिवा पूरग्रस्तांसाठी लावावा. मानवतेच्या भावनेने या कामाला मदत करावी, मदतीचा असा पूर आला तर बळीराजा पुन्हा उभारेल, काळ्या आईची सेवा करेल आणि भरभरुन धान्य पिकवेल. सरकारने महापॅकेज देऊन अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात यावर अधिकचा विचार होऊ शकेल पण गाव करेल ते कुणालाही जमणार नाही. तूर्त दिलासा मिळाला आहे. आपण सारे या वेळची एक पणती बळीराजाच्या अंगणात लावूया.