मारुती सुझुकीच्या काही कार्स झाल्या महाग
नवी दिल्ली :
भारतात 3 कोटीपेक्षा जास्त कार्सचे उत्पादन घेणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांनी आपल्या काही कार्स मॉडेलच्या किमती बुधवारपासून वाढवल्या आहेत. स्विफ्ट आणि ग्रँड विटारा या मॉडेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
स्विफ्ट या कारची किंमत 25 हजार रुपये वाढली असून ग्रँड विटाराची सिग्माची किंमत 19 हजार रुपये वाढली आहे. दिल्लीतील मारुती स्विफ्टची किंमत सध्याला 6 लाख ते 9 लाख रुपयांच्या घरात आहे. ग्रँड विटारा सिग्माची किंमत 11 लाख रुपये इतकी आहे.
2024 मध्ये दुसऱ्यांदा वाढ
कंपनीने आपल्या काही मॉडेल्सच्या किंमती यावर्षी दुसऱ्यांदा वाढवल्या आहेत. याआधी पाहता जानेवारी महिन्यात कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 0.45 टक्के इतक्या वाढवल्याची घोषणा केली आहे. वाढती महागाई व खर्चात झालेली वाढ यामुळे किमती वाढवल्या आहेत.
समभागात घसरण
याचदरम्यान मारुती सुझुकीच्या समभागाचा भाव दुपारी 3 च्या सुमारास 1.63 टक्के घसरणीसह 12681 रुपयांवर व्यवहार करत होता. याआधीच्या 9 एप्रिलच्या सत्रात ऑटो निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढला होता. समभागाने त्यावेळी 12980 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.