शहरातील स्मशानभूमींची समस्या तातडीने सोडवा
आमदार राजू सेठ यांची मनपा अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीसह शहरातील इतर स्मशानभूमीतील समस्या तातडीने दूर करा, अशा सूचना आमदार राजू सेठ यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. शुक्रवारी त्यांनी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली. सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या ठिकाणी सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, महानगरपालिकेचे जणू गोडाऊनच करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील सर्व जुने साहित्य आणि कचरा काढावा तसेच तेथे पथदीपांची व पाण्याचीदेखील सोय करावी, असे त्यांनी सांगितले. शहापूर स्मशानभूमीसह इतर स्मशानभूमीतीलही समस्या तातडीने सोडवा. सर्व स्मशानभूमीत प्रथम स्वच्छता मोहीम राबवा, विजेची व्यवस्था करा, शेड खराब झाला असेल तर शेडची दुऊस्ती करा. विशेष करून शहापूर स्मशानभूमीची दुरवस्था अधिक झाली आहे. तेव्हा तेथील सर्व समस्या तातडीने दूर करण्यासाठी पाऊल उचला यासाठी चार दिवसाचा अवधी त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे, मनपाच्या मुख्य अभियंता लक्ष्मी निपाणीकर, आरोग्य विभाग व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.