स्थानिक पातळीवर चर्चा करून समस्या सोडवा
उळ्ळागड्डीच्या शेतकऱ्यांना जि. पं. सीईओंचा सल्ला
बेळगाव : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात अडथळे न आणता स्थानिक पातळीवरच चर्चा करून शेतकऱ्यांनी आपली समस्या सोडवावी, असा सल्ला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिला. उळ्ळागड्डी खानापूर, ता. हुक्केरी येथे रस्त्याच्या कामाला विरोध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल शिंदे यांनी त्या गावाला भेट देऊन विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. रस्त्याच्या कामासाठी सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य द्यावे. तरच रस्ते बनवणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपसातील समस्या दूर करावी व यासंबंधी पत्र द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर उळ्ळागड्डी खानापूर येथील डिजिटल ग्रंथालयालाही भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेला अनुकूल व्हावे, यासाठी आणखी पुस्तके पुरविण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी पी.एम.जी.एस.वाय.च्या सुधाराणी, तालुका पंचायतीचे पी. आर. मलनाडद, एईई शशिकांत वंदाळे, लक्ष्मीनारायण, पीडीओ वसंत बडीगेर आदी उपस्थित होते.