क्रांतीनगरमध्ये जवानाचे घर फोडले
एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
बेळगाव :
क्रांतीनगर-गणेशपूर येथील एका लष्करी जवानाच्या घरात चोरीची घटना घडली आहे. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 1 लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने पळविले. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. सुजाता राजू होनगेकर, मूळच्या राहणार उचगाव, सध्या राहणार क्रांतीनगर तिसरा क्रॉस, गणेशपूर यांनी कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी भरदिवसा ही घटना घडली आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
सुजाता यांचे पती राजू लष्करी सेवेत आहेत. त्यांची मुले केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेतात. रोज त्यांना शाळेत सोडून घरी आणण्याचे काम सुजाता याच करतात. शुक्रवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या मुलांना शाळेत सोडले. 11 वाजता त्यांना घरी नेण्यासाठी त्या पुन्हा केंद्रीय विद्यालयाला पोहोचल्या. आपल्या घराला कुलूप लावून त्या शाळेकडे आल्या होत्या.
दुपारी 2 वाजता सुजाता घरी पोहोचल्या. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी 10 ग्रॅमची आठ चांदीची नाणी, चांदीची चेन असे एकूण 10 ग्रॅम सोने, 95 ग्रॅम चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. घटनेची माहिती समजताच कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कॅम्पचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला पुढील तपास करीत आहेत.