जवान संदीप खोत यांचा हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू
चांदेकरवाडी येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
कोल्हापूर
चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील भारतीय सैन्यातील जवान संदीप भिकाजी खोत यांचा कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथे सेवा बजावत असताना दि. 6 रोजी हृदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. सोमवार दि. 9 रोजी चांदेकरवाडी येथे त्यांच्या गावी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पारंपरिक शेती व्यवसाय करणारे आई साताबाई भिकाजी खोत व वडील भिकाजी खोत अशा शेतकरी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संदीप यांना सुरुवाती पासूनच कुस्तीची आवड गावातील मैदानामध्ये चटकदार कुस्त्या करून कुस्तीच्या शौकीनांची मने जिंकणारा संदीप यांनी खासदार मैदानात देखील प्रेक्षणीय कुस्त्या केल्या. 2003 साली त्यांच्या प्रयत्नातून त्यांना भारतीय सैन्यात संधी मिळाली. देशसेवेची आवड असलेल्या खोत यांनी कर्तव्य चोख पार पाडत आपल्या कामगिरीने पदोन्नती मिळवली 2020 साली निवृत्त होणार होते. पण हवालदारपदी बढती मिळाल्याने त्यांनी पुन्हा नोकरीचा कार्यकाल वाढवून घेतला निवृत्तीला दहा महिने बाकी असतानाच त्यांच्यावर नियतीने घाला घातला आणि पश्चिम बंगाल येथील कोलकत्ता येथे सेवा बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. सोमवार दि.9 रोजी त्यांचे पार्थिव मूळ गावी चांदेकरवाडी येथे येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून शासकीय विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
गावातील ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने व ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारासाठी मैदानावर तयारी केली आहे. बारा वर्षाचा हर्षवर्धन मुलगा आणि 14 वर्षाची संजीवनी मुलगी यांनी कुस्ती क्षेत्रात नावलौकीक करावा यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे.
सहा महिन्यात दोन जवानांचा मृत्यू
चांदेकरवाडी येथील सीआरपीएफ जवान दयानंद शामराव खोत यांचा सुट्टीवर आल्यानंतर चांदेकरवाडी येथे मृत्यू झाला होता. सहा महिन्यातच जवान संदीप भिकाजी खोत यांचा देशसेवा बजावत असताना मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.