कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे हुतात्मा
पंजाबमधील भटिंडा येथे देशसेवा बजावताना वीरमरण : गावासह परिसरावर शोककळा,कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीमध्ये आज होणार अंत्यसंस्कार
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील ज्योतीनगरमधील नागनाथ गल्लीतील रहिवासी जगदीश मनोहर शिंदे (वय 41) हे देशसेवा बजावत असताना शहीद झाले आहेत. त्यांना पंजाब भटिंडा येथे सोमवार दि. 2 रोजी वीरमरण प्राप्त झाले आहे. या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेबाबत अधिक माहितीनुसार हवालदार जगदीश शिंदे हे 131 एडी रेजिमेंट भटिंडा येथे 2 सप्टेंबर 2002 साली भरती झाले होते. त्यांनी आतापर्यंत याच रेजिमेंटच्या हैदराबाद, ओडिशा, पुणे, राजस्थान, जम्मू-काश्मीर, अरुणाचलप्रदेश आदी ठिकाणी सेवा बजावली होती. येत्या 30 सप्टेंबर 2026 रोजी ते आपली 24 वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होणार होते.
परंतु त्याआधीच त्यांना वीरमरण प्राप्त झाले. सेवानिवृत्ती जवळ आल्यामुळे सध्या ते भटिंडा याच ठिकाणी सेवा बजावत होते. तेथे मिलिटरीची मोठी क्रॅट टाटा गाडी सेवेसाठी घेवून जाण्याच्या तयारीत असताना अचानक टायर फुटून त्याचेवरील लोखंडी व्हील त्यांच्या छातीवर जोराने आदळले आणि देशसेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले. ही बातमी रात्री उशिरा त्यांचे मेहुणे निवृत्त जवान महेंद्र टेगनाळे यांना मिळाली. परंतु हुतात्मा जवान जगदीश यांचे आई-वडील वयोवृद्ध असल्याने त्यांनी त्यांना व इतर नातेवाईकांसह मित्रमंडळींना दि. 3 रोजी सकाळी ही माहिती दिली. ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली. लागलीच त्यांच्या घराजवळ आजी, माजी ग्रा. पं. सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. महत्त्वाचे म्हणजे सध्या ते त्यांची पत्नी रेखा व मुले अदित्य (14) व आदर्श (11) यांच्यासमवेत तेथेच वास्तव्याला होते.
लहान भाऊसुद्धा देशसेवेमध्येच
हुतात्मा जवान जगदीश शिंदे यांचे लहान भाऊ महेश शिंदे हे सुद्धा भारतीय सेनेत असून तेही पंजाबमध्ये सहकुटुंब वास्तव्यास आहेत. ही सर्व मंडळी हुतात्मा जवान जगदीश यांच्या पार्थिवाबरोबर बुधवार दि. 4 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत सांबरा विमानतळावर येतील. त्यानंतर 10 वाजेपर्यंत कंग्राळी खुर्दला पार्थिव येईल, असे सांगण्यात आले. पार्थिव गावामध्ये आल्यावर संपूर्ण गावभर शोकमिरवणूक काढून कंग्राळी खुर्द येथील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.अंत्यसंस्काराची तयारी म्हणून ग्रामपंचायत, तरुण मंडळे, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची तसेच स्मशानभूमीत संपूर्ण स्वच्छता करून चौकाचौकामध्ये हुतात्मा जवान जगदीश शिंदेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावून शोक व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.
हुतात्मा जवान जगदीश शिंदे यांचे वडील मनोहर शिंदे बेळगावचे. कामानिमित्त ते कंग्राळी खुर्द येथे आले. जगदीश यांचा जन्म कंग्राळी खुर्द येथेच झाला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण कंग्राळी खुर्द सरकारी मराठी प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण मार्कंडेय हायस्कूल येथे झाले. 12 वी मराठा मंडळ कॉलेजमध्ये पूर्ण करून 2002 मध्ये 131 एडी रेजीमेंटमध्ये भरती झाले होते. सध्या त्यांच्या घरात त्यांचा लहान भाऊ महेश हेही देशसेवा बजावत आहेत तर त्यांची बहीण ज्योतीचे पती मेहुणे महेंद्र टेगनाळे हे निवृत्त जवान आहेत. एकूण त्यांच्या घराण्याने देशसेवेचा वसा घेतलेला आहे. ते नागनाथ युवक मंडळ रामदेव गल्ली गणेशोत्सव मंडळ तसेच ज्योतीनगर परिसरातील अन्य मंडळांचे सक्रिय सभासद व आधारस्तंभ होते.