कर्ले गावच्या जवानाचा अपघातात मृत्यू
अंबाला कँट हरियाणा येथून येताना गरोठ महामार्गावर अपघात : कर्ले गावावर शोककळा
किणये : घरच्या कार्यक्रमासाठी एक महिन्याची सुटी घेऊन अंबाला कँट हरियाणा येथून कारगाडी घेऊन येत असताना उज्जैन-गरोठ महामार्गावर कारची ट्रकला धडक होऊन झालेल्या अपघातात कर्ले गावचा सुपुत्र नायक रामचंद्र मोहन पाटील (वय 32) यांचा मृत्यू झाला. तसेच कारगाडीत बसलेले गोविंद पाटील हे किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात शुक्रवार दि. 1 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास उज्जैन, झारडा येथील गरोठ महामार्गावर झाला आहे. या अपघाताच्या दुर्घटनेमुळे कर्ले गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत कर्ले गावातील नागरिकांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नायक रामचंद्र मोहन पाटील हे अंबाला कँट हरियाणा येथे सेवा बजावत होते. एक दिवस आधीच त्यांनी आपली पत्नी श्रुती रामचंद्र पाटील यांना विमानाद्वारे बेळगावला पाठविले होते. तर ते स्वत: शुक्रवारी पहाटे कारगाडी घेऊन गावाकडे येण्यासाठी रवाना झाले होते. शुक्रवारी दुपारी गरोठ महामार्गावर कारची ट्रकला धडक बसून अपघात झाला. या अपघातात नायक रामचंद्र पाटील हे जागीच ठार झाले.
नायक रामचंद्र पाटील हे 640 ईएमई बटालियन अंबाला कँट येथे सेवा बजावत होते. 2013 साली मुधोळ रॅलीतून लष्करी सेवेत रुजू झाले. 3 ईएमई सेंटर भोपाळ येथे लष्करी सेवेसाठी प्रशिक्षण घेतले.
त्यांनी घर बांधूनच लग्न करायचे ठरवून कर्ले गावात घर बांधले. तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. स्वत: व लहान भाऊ नामदेव या दोघांचीही लग्ने करण्यात आली. सहा महिन्याभरापूर्वी त्यांनी किया ही नवीन कारगाडी घेतली होती. घरच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी एक महिन्यासाठी गावी येण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार पत्नी श्रुती पाटील यांना विमानाने बेळगावला पाठविले होते. त्या शुक्रवारी सकाळीच बेळगावला आल्या होत्या. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
शनिवारी रात्री त्यांचा मृतदेह बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटल येथे आणण्यात आला. रविवारी सकाळी साडेसात वाजता नायक रामचंद्र पाटील यांचे पार्थिव कर्ले गावात आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात सकाळी 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.