For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘कुसुम-बी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सौर कृषीपंप

06:04 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘कुसुम बी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सौर कृषीपंप
Advertisement

राज्य सरकारचे 50 तर केंद्राचे 30 टक्के योगदान : शेतकऱ्याला केवळ 20 टक्के खर्च

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

विजेवरील भार कमी होऊन शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कृषी पंपसेट मिळावा, या दृष्टीने राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी ‘कुसुम-बी’ योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. 3 ते 10 एचपीपर्यंत क्षमता असलेल्या विहिरींसाठी सौर कृषीपंप बसविण्यास राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकार यांचे अनुदान एकत्रितरीत्या मिळणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ 20 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

Advertisement

राज्यात विजेचा मर्यादित साठा असल्याने शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा थ्री फेज विद्युतपुरवठा कमी करण्यात येत आहे. बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी थ्री फेज विद्युतपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांनाही तापदायक ठरते. दिवसा घरगुतीसह औद्योगिक क्षेत्राला वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा देण्याशिवाय हेस्कॉमकडेही पर्याय नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषीपंप बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

केंद्र सरकारच्या कुसुम-बी योजनेला जोडून राज्य सरकारने यामध्ये स्वत:चे अनुदान जमा केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये 40 हजार सौर कृषीपंप बसविण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. सध्या राज्यात शेतकऱ्यांना मोफत थ्री फेज वीजपुरवठा केला जात असला तरी तो मर्यादित स्वरुपात असल्याने शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सौर कृषीपंप सवलतीच्या दरात दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे, तर 30 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. उर्वरित 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. त्यामुळे एकूण प्रकल्पाच्या 20 टक्के रक्कम शेतकऱ्यांना खिशातून घालावी लागणार असून आपल्या गरजेनुसार शेतीसाठी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

योजनेसाठी स्वतंत्र वेबसाईट

कुसुम-बी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र वेबसाईट तयार केली आहे. प्ttज्s://sदल्raस्ग्tra.म्दस् या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी 080-22202100 या क्रमांकाशी संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या हेस्कॉम कार्यालयातही या योजनेबाबतची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना घेता येणार आहे.

Advertisement
Tags :

.