सरपंच ग्रामसेवकाने केला पंधराव्या वित्त आयोगात लाखोंचा घोटाळा ! दिव्यांगाच्या निधीची लावली परस्पर व्हिलेवाट
तक्रार देऊनही सरपंच, ग्रामसेवकावर कारवाई होईना, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
धाराशिव : वार्ताहर
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसेवकाने पंधरावा वित्त आयोगामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा केला असून दिव्यांगांच्या निधीची परस्पर व्हिलेवाट लावली आहे. विशेष म्हणजे तक्रार करुनही वरिष्ठ अधिकारी सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संबंधित तक्रारदाराने केला आहे. दिव्यांग बांधवाना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन लाखो रुपयांची तरतूद करत आहेत. मात्र, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी व लोकसेवक शासनाच्या उद्देशालाच एकप्रकारे हरताळ फासताना दिसत आहेत. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च करणे केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार बंधनकारक आहे. १७ एप्रिल २०१७ पासून हा कायदा देशभर लागू झाला आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील सरपंच गजानन कोकरे व तत्कालीन ग्रामसेवक चव्हाण यांनी वित्त आयोगाचा निधी तरतुदी प्रमाणे खर्च न करता व अपंग प्रकारानुसार दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप न करता निधी परस्पर हडप केल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात केमवाडी येथील औदुंबर ताटे यांनी मार्च 2024 मध्ये गट विकास अधिकारी तुळजापूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. तक्रार देऊनही पाच महिन्याचा कालावधी संपत आला आहे. मात्र, अद्यापही सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर निलंबनाची कारवाई करावी व अपहार केल्या प्रकरणी संबंधिततावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
सरपंच ग्रामसेवकावर अधिकारी मेहरबान
पंधरावा वित्त आयोगामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे सिद्ध असताना यासंदर्भात लेखी तक्रारी करुनही गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी घोटाळेबाज सरपंच ग्रामसेवकावर कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.