For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी; कंत्राटी ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल

03:11 PM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी  कंत्राटी ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल
Advertisement
सोलापूर | प्रतिनिधी : दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी देत 16 लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून कंत्राटी ऑपरेटर राहुल शांतीकुमार गायकवाड याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार किरण दिगंबर जमदाडे (वय 55, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. शासकीय कार्यालयात कागदपत्रे फेकून देत कामकाजात अडथळा आणल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, 21 ऑक्टोबर रोजी दुपारी तहसीलदार किरण जमदाडे हे दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांसमवेत काम करीत होते. त्यावेळी राहुल गायकवाड कार्यालयात आला आणि त्याने आपल्या बिलाबाबत विचारणा केली. त्यावर जमदाडे यांनी संबंधित बिल योग्यरीत्या काढले असून कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याचे सांगितले.

Advertisement

यामुळे संतप्त झालेल्या गायकवाड याने तहसीलदारांच्या टेबलावरील कागदपत्रे खाली फेकून दिली. तसेच बिल मंजूर केल्याशिवाय दुसरे कोणतेही काम करू देणार नसल्याचे सांगत शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

16 लाख रुपयांच्या मागणीचा आरोप

2024 मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान पुरविलेल्या वाहनाचे बिल कमी काढल्यामुळे आपले 16 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा गायकवाड याने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही रक्कम तहसीलदारांनी द्यावी, अशी मागणी करून पैसे देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिल्याचा आरोप आहे.

Advertisement

तसेच तहसीलदारांच्या मुलीबाबत आक्षेपार्ह धमकी दिल्याचे आणि त्यांच्या दिव्यांगत्वाचा उल्लेख करून अपमानास्पद भाषा वापरल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

बनावट सह्या आणि जावक क्रमांकाचाही उल्लेख

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम केल्याबाबतची देयके मंजूर करून घेण्यासाठी बनावट सह्या आणि बनावट जावक क्रमांक वापरल्याचा आरोपही समोर आला आहे. संबंधित कागदपत्रे खरी असल्याचे भासवून उपजिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली आणि शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा अहवाल रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गायकवाड याची पत्नी कोमल गणेश कांबळे यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित केल्याचा राग आणि विधानसभा निवडणुकीत पुरविलेल्या वाहनाच्या बिलातून मागणीनुसार अतिरिक्त 16 लाख रुपये मंजूर न झाल्यामुळे हे कृत्य केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

सदर बझार पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत. धमकी, शासकीय कामात अडथळा आणि देयकांशी संबंधित आरोपांची पोलीस चौकशी करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.