For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : कोंडीत गुदमरले दुसऱ्या दिवशीही सोलापूर !

05:51 PM Dec 10, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   कोंडीत गुदमरले दुसऱ्या दिवशीही सोलापूर
Advertisement

                 विजापूर रोडवर दोन दिवसांची प्रचंड ट्रॅफिक कोंडी

Advertisement

सोलापूर : विजापूर रोडवरील रेल्वे पुलाच्या बेअरिंग बदल कामामुळे सोमवारी आणि मंगळवारचा दिवस सोलापूरकरांसाठी आणखी एक 'ट्रॅफिक आपत्ती' ठरला. पत्रकार भवन ते जुना विजापूर नाका हा महत्त्वाचा मार्ग बंद असल्याने संपूर्ण शहराची वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाचे नियोजन आणि वाहतूक पोलिसांचे दावे कागदावरच राहिले, प्रत्यक्षात नागरिकांच्या नशिबी आली ती तासन्तास चालणारी कोंडी, त्रास आणि संताप!

सोमवारी झालेल्या मोठ्या कोंडीनंतर 'पोलीस कर्मचारी पर्यायी मागाँवर तैनात असतील, असा गाजावाजा वाहतूक शाखेने केला होता.मात्र हा दावा मंगळवारी दुपारपासूनच धुळीस मिळालेला दिसला. पर्यायी रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी, कुठेही दिशा देणारे कर्मचारी नाहीत, सिग्नल पूर्णपणे बेहाल... अशी परिस्थिती पाहून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले.

Advertisement

कामगार, विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत सर्वांनीच आजचा प्रवास कोंडीच्या यातनेतच केला. शहरातील पर्यायी मार्गावर सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही मिनिटांचा प्रवास तासभराचा बनला. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास पुलाचे बेअरिंग बसवण्याचे काम पूर्ण झाले आणि रस्ते तसेच रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्यातआली.

पण दोन दिवस चाललेल्या या कोंडीच्या कहरानंतर नागरिकांनी प्रशासनाच्या तयारीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. सोलापूरची वाहतूक व्यवस्था एकदा नव्हे तर पुन्हा एकदा कोलमडलेली दिसली आणि त्याची किंमत मोजावी लागली ती केवळ सर्वसामान्य सोलापूरकरांना.

वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये नाराजी
शहरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यायी मार्गावर वाहतूक पोलीस तैनात असतील असे वाटले होते पण, कुठेही वाहतूक पोलीस कर्मचारी बोटावर मोजण्याइतकेच दिसून आले. रस्त्यांची मर्यादा आणि वाहनांची प्रचंड संख्या यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण बनल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.