For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूर ग्रामीण पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई; एमडी ड्रग्जसह आरोपी अटकेत, रांजणीत गांजा जप्त

07:00 PM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोलापूर ग्रामीण पोलिसांची ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई  एमडी ड्रग्जसह आरोपी अटकेत  रांजणीत गांजा जप्त
Advertisement
सोलापूर | प्रतिनिधी : अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. टेंभुर्णी परिसरात एमडी ड्रग्जसह एका संशयिताला अटक करण्यात आली, तर पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात शेतातून गांजा जप्त करण्यात आला. या दोन कारवायांमध्ये मिळून 25 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टेंभुर्णीत एमडी ड्रग्जसह आरोपीला अटक

पहिली कारवाई टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्डुवाडी पुलाजवळ करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, गौतम अजित भोसले हा किया सेल्टोस कारमधून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित कार थांबवली आणि गौतम भोसले याला ताब्यात घेतले.

Advertisement

गौतम अजित भोसले (वय 38, रा. वेणेगाव, ता. माढा) याच्याकडून 5.52 ग्रॅम एमडी ड्रग्ज, किया सेल्टोस कार, दोन मोबाईल फोन, वजनकाटा, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा एकूण 21 लाख 61 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने अन्य दोन साथीदारांसह ओडिशा येथे जाऊन अंमली पदार्थ आणल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

रांजणीत शेतातून गांजा जप्त

दुसरी कारवाई 24 ऑक्टोबर रोजी पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे एका शेताची तपासणी केली. पंकेश मोहन दांडगे याच्या घराशेजारील शेतात कापून भारे बांधून ठेवलेला गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून, या प्रकरणातील पुढील कारवाई सुरू आहे.

यंदा 91 गुन्हे दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2026 पासून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एनडीपीएस कायद्यान्वये 91 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 25 गुन्ह्यांमध्ये सुमारे 2 कोटी 51 लाख रुपयांचे अंमली पदार्थ आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांविरोधातील मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याबरोबरच जनजागृतीवरही भर दिला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली असून, अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींविरोधात कायद्यानुसार तपास आणि कारवाई केली जात आहे.

Advertisement
Tags :

.