Solapur News | कडक भाकरी, मासे, बिर्याणी अन् बाजार आमटीवर सोलापूरकरांचा ताव
सोलापूर प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा
सोलापूर -झणझणीत शेंगा चटणीचा अन बाजार आमटीचा स्वाद कडक भाकरीसोबत, अन शेंगा पोळी व पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी शाकाहरींचा तर उजनी धरणातील मासे, बिर्याणी वर ताव मारण्यासाठी मांसाहारी सोलापूरकरांनी नार्थ कोर्टवर चांगलीच गर्दी केली आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने शहरातील नॉर्थ कोट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय रुक्मिणी प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी मोठ्या थाटात पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जि.प. सीईओ कुलदीप जंगम यांचीही उपस्थिती होती.
अलिकडच्या काळात शेतातील रस्त्यावर बैलगाड्या दिसत नाहीत. पण बैल व बैलगाडीचे आकर्षण प्रत्येकाला आहे. त्यामुळे घरात शोकेसमध्ये बैलगाडी ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशीलअसतात. या वस्तू या प्रदर्शनात असल्याचे दिसून येत आहेत. या प्रदर्शनात एकूण ७५ स्टॉल आहेत. या स्टॉलमध्ये सोलापूरची कडक भाकरी, शेंगा चटणी, दुग्धजन्य पदार्थ, हस्तकला वस्तू, लाकडी बैलगाडी खेळणी, कापडी पिशवी, लोकरी, जैन घोंगडी, मिलिट पदार्थ, कुकीज मसाले,कोल्हापुरी चप्पल, सेंद्रिय डाळी, बंजारा आर्ट, फळे व भाजीपाला अशी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
सोलापुरातील मासांहारी खवय्यांसाठी उजनी धरणातील मासे, खेकडा, बिर्याणीचा स्वादही याठिकाणी घेता येणार आहे. करकंबच्या बाजार आमटीची चवही याठिकाणीचाखताना सोलापूरकर दिसून येत आहेत. या ठिकाणी दररोज सायंकाळी बचत गटाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद घेता येणार आहे. सोलापुरात वर्षातून होणाऱ्या प्रदर्शनाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सीईओ कुलदीप जंगम यांनी केले आहेत.