Solapur Heatwave | सोलापूरकर उन्हाने हैराण; 'डिहायड्रेशन' आणि डोकेदुखीच्या तक्रारीत मोठी वाढ
सोलापुरात तापमान ४० पार
सोलापूर -शहरात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. डोकेदुखी, अशक्तपणा व 'डिहायड्रेशन' च्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सिव्हिल, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची स्थिती आहे.
दुपारच्या वेळेत तापमान उच्चांकगाठत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे अनेकांना घाम येणे, थकवा, डोकेदुखी यासारखा त्रास जाणवत आहे. उन्हामुळे होणाऱ्या त्रासाचे सौम्य स्वरूपातील रुग्ण येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
उन्हात बाहेर पडताना घ्यावी काळजी
उष्माघातासारखी लक्षणे असलेले अद्याप कोणताही गंभीर रुग्ण आतापर्यंत दाखल झालेला नाही. परंतु उन्हामुळे डोकेदुखीसह सौम्य स्वरूपातील त्रासाचे रुग्ण ओपीडीत येत आहेत. उन्हात बाहेर पडताना नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. - डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक, सोलापूर
अशी घ्यावी काळजी...
1. दुपारी १२ ते ४ यावेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
2. दिवसातून भरपूर पाणी प्यावे, लिंबूपाणी, ताक, ओआरएसचा समावेश करावा,
3. हलके, सेल आणि सुती कपडे परिधान करावेत.
4. तेलकट, मसालेदार आणि जड आहार टाळावा, फळे व हलका आहार घ्यावा.
5. उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे टाळावे; थोडा वेळ विश्रांती घ्यावी.
6. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
7. सतत चक्कर, उलट्या, ताप किंवा अशक्तपणा जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.