For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Police Raid: सोलापुरात ग्रामीण पोलिसांची बारवर धाड, 38 जणांना घेतले ताब्यात

04:40 PM May 02, 2025 IST | Snehal Patil
solapur police raid  सोलापुरात ग्रामीण पोलिसांची बारवर धाड  38 जणांना घेतले ताब्यात
Advertisement

या बारमध्ये मागील काही दिवसांपासून परवानगीशिवाय अश्लील नाचगाणे सुरु होते

Advertisement

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंद्रुप-कामती रोडवरील कंदलगाव शिवारातील पुष्पक ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून 38 जणांविरुद्ध कारवाई केली आहे. अश्लील नाचगाणे व अवैध उद्योगप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या छाप्यात महिलांसह बार मालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि ग्राहक अशा 38 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी, या बारमध्ये मागील काही दिवसांपासून परवानगीशिवाय अश्लील नाचगाणे सुरु होते. दरम्यान, या छाप्यात सुमारे 25 लाखांच्या बनावट नोटा, रोख रक्कम, मोबाईल, वाहने, लॅपटॉप आणि साऊंडबॉक्स असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईचा तपशील सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने करण्यात आला.

Advertisement

मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे आणि पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. माहिती मिळताच पोलिसांनी पंच साक्षीदारांसह बारवर छापा टाकला असता, महिला अश्लील हावभाव करत स्टेजवर नाचताना आढळल्या. ग्राहक नकली नोटा उधळून अश्लील मजा घेत होते. या कारवाईत एकूण सुमारे 28 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, असल्याची माहिती मिळाली आहे.

या कारवाईत आरोपी म्हणून कोलकाता, गुजरात, दिल्ली, बेंगलोर व सोलापूरसह विविध ठिकाणांहून आलेल्या महिलांचा व ग्राहकांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, महाराष्ट्र अश्लील नृत्य प्रतिबंध अधिनियम, तसेच नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू असून तपासाची जबाबदारी मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जप्त रोख व बनावट नोटांचा स्रोत, महिलांचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि परवाना धारकतेचा तपास सुरू आहे. महिला आरोपींना हजर राहण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल

  • रोख रक्कम 25,25,760 रुपये
  • मिळालेले मोबाईल फोन 1,23,500 रुपये
  • वाहने व इतर साहित्य 1,80,000 इतका रकमेच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला
Advertisement
Tags :

.