सोलापूर-पुणे शिवाई इलेक्ट्रिक बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 20 प्रवाशांचे वाचले प्राण
04:54 PM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सोलापूर : सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इलेक्ट्रिक शिवाई बसला सोमवारी (26 ऑक्टोबर) सकाळी सुमारे 11.10 वाजता पुण्यातील स्वारगेट परिसरात अपोलो हॉस्पिटलसमोर भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली असून, बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याकडे प्रवास करणारी ही इलेक्ट्रिक शिवाई बस स्वारगेट परिसरात आली असताना अचानक आग लागली. आग लक्षात येताच चालकाने तातडीने बस थांबवून आतील प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने बसमधील सुमारे 20 प्रवाशांचे प्राण वाचले.
Advertisement
काही वेळातच आगीने संपूर्ण बसला वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. बसला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
इलेक्ट्रिक बसला लागलेल्या या आगीमुळे वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आगीचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
Advertisement
Advertisement
