Solapur | सोलापूर पोलिसांचा मोठा दणका! आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश, ६ दुचाकी जप्त
सोलापूरमध्ये आंतरराज्यीय दुचाकी चोर अटक; ६ मोटारसायकली जप्त
सोलापूर -सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आंतरराज्यीय दोन दुचाकी चोरांना अटक करून त्यांच्याकडून पावणे दोन लाखांच्या ६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.प्रमोद अर्जुन जेऊर (वय २१, रा. अतारगा ता. इंडी जि. विजयपूर) आणि अमोल भाऊसाहेब चव्हाण (वय २६, रा. जाधव वरती, आरकेरी, ता. विजयपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने, सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने शहर गुन्हे शाखेचेपोलीस पथक हे आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विनोद रजपूत यांना चोरी केलेली मोटारसायकल क्र. एम. एच. १३ डी. पी. १९२७ ही हिरो रप्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल घेऊन कर्नाटकातील दोन व्यक्ती गंगामाई हॉस्पीटल परिसरात संशयास्पदरीत्या थांबलेले आहेत. या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ सदर ठिकाणी सापळा लावून एम.एच.१३ डी.पी. १९२७ या मोटार सायकलवर परिसरात फिरत असलेल्या दोन संशयितांना गंगामाई हॉस्पिटल परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्यांची नावे प्रमोद अर्जुन जेऊर व अमोल भाऊसाहेब चव्हाण अशी असल्याचे समजले. दुचाकीबाबत चौकशी केली असताती दुचाकी चोरीची असल्याचे दिसून आले.
पोलिसांच्या पथकाने त्यांना अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता, त्यांनी मागील सहा महिन्यात सोलापूर शहरातून आणखी ५ मोटार सायकली चोरल्याअसल्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांना गुन्ह्यात अटक केली व तपासामध्ये आरोपींनी आणखी ५ मोटार सायकली त्यांनी जेऊर (जि. विजापूर, कर्नाटक) येथून काढून दिल्या आहेत. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून मोटार सायकल चोरीचे ६ गुन्ह्यातील १ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड. महेश रोकडे, मंजूनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, प्रमोद गायकवाड, मुण्यम सावंत, छोटेसाहेब जहागिरदार, तसेच सायबर पोलीस ठाण्यातकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केला.