Solapur News : बोरामणीजवळ ८ लाखांचा ३६ किलो गांजा जप्त
01:29 PM Jun 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; तिघांना अटक
सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छत्तीसगडमधून होणारी गांजाची वाहतूक बोरामणीजवळ पकडली. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक करून ७ लाख ५५ हजार रुपये किमतीचा ३६ किलो २७० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. सचिन लक्ष्मण बनसोडे (वय ३९, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), एकनाथ नामदेव लेंढवे (वय ३३, रा. मेथबडे, ता. सांगोला) आणि अनिल लक्ष्मण रोंगे (रा. खर्डी, ता. पंढरपूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत हवालदार मोहन मनसावाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार स्थानिकचे पथक हे संबंधित गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सचिन बनसोडे व एकनाथ लेंडवे हे दोघे जगदलपूर (राज्य छत्तीसगड) येथून अमली पदार्थ गांजा याची वाहतूक करून विक्री करण्याकरीता हैद्राबाद रोडवरील बोरामणी गावच्या हद्दीतील हॉटेल वैष्णवीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस पथकाने हॉटेल वैष्णवीजवळ सापळा लावून संशयितांचा शोध घेतला असताना हॉटेल वैष्णवी समोरील डांबरी रस्त्याच्या बाजूस रोडलगत दोन व्यक्ती त्यांच्यासोबत सोबत दोन मोठ्या बॅगासह उभे असल्याचे दिसले.
त्यांना पोलिसांनी जागीच पकडून चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सचिन लक्ष्मण बनसोडे व एकनाथ नामदेव लेंढवे अशी सांगितली. त्यांच्याकडील तपासणी केली असता बँगाची त्यामध्ये निळ्या रंगाच्या दोन प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण ३६ किलो २७० ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा मिळून आला.
या गांजाची किंमत सात लाख २५ हजार ४०० रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा व दोन मोबाईल असा एकूण ७लाख ५५ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पकडलेल्या दोघांकडे मिळून आलेल्या अमली पदार्थ गांजाबाबत विचारपूस केली असता त्या दोघांनी सांगितले, अमली पदार्थ गांजा हा जगदलपूर (राज्य छत्तीसगड) येथून विकत आणला आहे.
तो अमली पदार्थ गांजा अनिल लक्ष्मण रोंगे यास विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिल रोंगे याची माहिती काढून त्यासही गुन्ह्याच्या कामी मोहोळ येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार मोहन मनसावाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, भिमगोंडा पाटील, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहायक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे, सतीश बुरकुल यांनी केली.
Advertisement
Advertisement