For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी; सोलापूर विशेष न्यायालयाचा कठोर निकाल

05:41 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी  सोलापूर विशेष न्यायालयाचा कठोर निकाल
Advertisement

सोलापूर : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी व्यंकटेश नरसप्पा गुड्डी (रा. सीबीडी बेलापूर, नवी मुंबई) याला सोलापूर येथील विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी हा निकाल दिला. आरोपीला 1,500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.

Advertisement

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर 2017 मध्ये पीडिता आपल्या मावशीच्या घरी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे गेली होती. तेथे तिची आरोपीशी ओळख झाली होती. ही बाब पीडितेच्या आईला समजल्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये तिला सोलापूरला परत आणण्यात आले.

दरम्यान, 9 मार्च 2018 रोजी कॉलेजमध्ये पेपर देण्यासाठी गेलेली पीडिता घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती न मिळाल्याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास करून पीडितेला शोधून काढले तसेच आरोपी व्यंकटेश गुड्डी याला ताब्यात घेतले.

Advertisement

तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने 10 साक्षीदार तपासले. पीडिता, डॉक्टर आणि फिर्यादी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी आरोपी व्यंकटेश गुड्डी याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1,500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. शीतल डोके, तर आरोपीतर्फे ॲड. आर. एल. तळ्ळीकर यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.