Solapur : निवडणुकीपूर्वी सोलापूर महापालिकेची मोठी शिस्तबद्ध कारवाई
सोलापूर शहर झाले बॅनरमुक्त
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासनाने विविध भागांतून राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी लावलेले तीन हजार ११५ फलक हटवले. यासाठी सलग चार दिवस काम चालल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिली.
या प्रकरणात पालिकेने एकावरही गुन्हा दाखल केलेला नाही. आचारसंहितेच्या काळात असे फलक लागलेले दिसल्यास गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. शहरातील होटगी रोड, विजापूर रोड, दत चौक, अक्कलकोट रोड, माणिक चौक, पद्मशाली चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर बॅनर होते. हे बॅनर, डिजिटल फलक हटविल्यामुळे रस्ते, चौक मोकळा श्वास घेत आहेत. नागरिकांनी ही कारवाई सातत्याने सुरू राहावी, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या नॉर्थकोट येथील निवडणूक कार्यालयात आचारसंहिता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी आचारसंहिता भंगाची तक्रार करता येईल. पालिकेच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली आहे. त्यासोबत संबंधित मोबाईल नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. निवडणुकीच्या काळात धार्मिक तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नका. धाि मक कार्यक्रमांचे बॅनर लावताना त्यातून राजकीय प्रचार होऊ नये याची काळजी घेण्यात यावी.
प्रार्थनास्थळांचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करू नये. या भागात कोणत्याही प्रकारची बॅनरबाजी करू नये. या कृती करताना कोणी आढळल्यास आचारसंहिता कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.