गणेशोत्सवासाठी सोलापूर महापालिका यंत्रणा सज्ज; विसर्जन घाट व मिरवणूक मार्गाची पाहणी

सोलापूर : आगामी गणेशोत्सव निर्विघ्न, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसेच गणेशमूर्ती विसर्जन आणि मिरवणुका सुरक्षितपणे पार पडाव्यात, यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीनंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत महापालिका अधिकारी, पोलीस प्रशासन, महावितरणचे अधिकारी आणि मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध विसर्जन घाट आणि गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान आवश्यक सुविधा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता तसेच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम येवलेकर, सहाय्यक अभियंता सुनीता इभारे, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वेदांत बॉम्बे, एन. टी. मुजावर, पी. डी. राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.