Solapur News : सोलापूर शेतकरी संघटनेचा पुण्यात बेमुदत आंदोलन सुरू
सोलापूरातील शेतकऱ्यांचा कारखानदारांविरोधी आंदोलन
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखानदारांनी ऊस दर आजतागायत जाहीर न केल्याने ऊस उत्पादक शेतकर्यावर अन्याय होत असल्याने याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते पुणे साखर आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत.
ऊस उत्पादक शेतकर्यांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका आंदोलकांची आहे. साखर आयुक्तांंनी साखर कारखानदारांना दर घोषीत न केल्याबद्दल नोटीसा देवून जाब विचारणे गरजेचे असताना साखर आयुक्त हे डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे.
साखर कारखाने सुरु होवून एक महिन्याच्यापुढे कालावधी उलटूनही कारखानदार चिडीचूप असल्याने जिल्ह्यातील कष्टकरी शेतकर्यावर घोर अन्याय होत असल्याचा आंदोलकांचे म्हणणे आहे. 15 दिवसात पहिला हप्ता देणे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक असताना या कायद्यालाही कोलदांडा घालण्याचा प्रयत्न कारखानदारांनी केला आहे. इतर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर घोषीत केले. काही ठिकाणी 3 हजार 500 रुपये मे.टन घोषीत करुन तेथील शेतकर्यांना कारखानदारांनी न्याय दिला आहे.
सोलापूर जिल्हाच याला अपवाद का ठरतोय याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ सध्या आली आहे. शेतकरी हा रात्रंदिवस कष्ट करणारा माणूस असून ऊसाला 18 महिने संभाळावे लागत आहे. रात्रीचा दिवस करुन तो आपले ऊसाचे पिक जगवत असतो. सध्या बाजारात खताचे दर, नांगरट दर,मजूरी दर, लागवड दर, पाणी पट्टी आदींचा हिशोब केला असता तीन हजार रुपयेच्या आत दर शेतकर्यांना परडवत नसल्याने शेती उद्योग संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत देश हा कृषीप्रधान म्हणून ओळखला जात असताना इकडे कारखानदार मात्र शेतकर्यांना चिरडून शेती उद्योग नष्ट करण्याच्या भूमिकेत असल्याचा आरोप होत आहे.