सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेकांचे अर्ज बाद
सांगली, सातारा आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत छाननीनंतर अनेक दिग्गजांना निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडावे लागले आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेकांचे अर्ज बाद
छाननीदरम्यान माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बँकेचे माजी संचालक तथा माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, जयवंतराव जगताप, सिद्धाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक आणि ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे यांच्यासह अनेकांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत.
बँकेच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात 2024 मध्ये माजी संचालकांवर कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत 10 माजी संचालकांचे अर्ज बाद करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी घेतला.
मोहिते पाटील कुटुंबाला काहीसा दिलासा
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असून, बँकेच्या निवडणुकीतील त्यांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
167 उमेदवारांचे अर्ज वैध
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण 201 उमेदवारांनी 238 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये 41 अर्ज बाद करण्यात आले, तर 30 अर्ज दुबार असल्याचे आढळले. त्यामुळे एकूण 167 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.
वैध उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे या कालावधीत कोणते उमेदवार माघार घेतात आणि अंतिम निवडणूक मैदानात कोण राहतात, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दिग्गजांचे अर्ज बाद झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.