धाराशिवमध्ये 13 लाखांचा गांजा जप्त! एकाच कुटुंबातील 5 जणांवर कारवाई
धाराशिव : प्रतिनिधी
दुर्गम भागात साठा करून ठेवलेला सुमारे 12 लाख 80 हजार 490 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई भूम पोलिसांनी परंडा तालुक्यातील ईडा येथे सोमवारी केली असून, याप्रकरणी एका कुटुंबातील पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की,पोलीसांना ईडा (ता. भुम) येथे संतोष संजय जाधव या व्यक्तीने फार मोठ्या प्रमाणात गांजाची साठवणूक केली आहे. माहिती प्राप्त होताच परंडा पोलीस ईडा येथे सदरील व्यक्तीच्या घरी शहानिशा करण्याच्या उद्देशाने गेले. यावेळी सदरील घर बंद होते तर दरवाजाला कुलूप असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी महसुल विभागाचे प्रतिनीधी, वजन मापे निरीक्षक, दोन शासकीय पंच यांना सोबत घेवून पोलिसांनी सदरील घरावर घर मालकाच्या नातेवाईकांच्या समक्ष छापा टाकला. छाप्याच्या दरम्यान घरामध्ये 12,80,490 इतक्या रकमेचा एकुण 85 किलो 366 ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा आढळून आला. घराची सखोल तपासणी करुन सदरील गांजा शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आला. हे गाव परंडा पोलीस स्टेशनअंतर्गत येते तथापि पोलीस स्टेशन परंडापासून हे गाव अंदाजे 25 किलोमीटर लांबीवर असुन अत्यंत दुर्गम भागात आहे. याचाच फायदा घेवून आरोपी संतोष संजय जाधव यांनी गांजा विक्रीचा व्यवसाय करुन त्यातुन पैसा कमवित होता आणि तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलीत होता,असे परंडा पोलिसांनी सांगितले. सदरील प्रकरणात पोलीस स्टेशन परंडा येथे गुरनं 285/2023 कलम 8(क), 20(ब)ii(क), कलम 29 गुंगीकारक औषधी द्रव व मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 अंतर्गत सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत. सदरील गुन्ह्यात घरातील सर्व पाचही लोकांना आरोपी करण्यात आले असून, यात संजय रामदास जाधव, बायडाबाई संजय जाधव, सुजराबाई रामदास जाधव, संतोष संजय जाधव आणि पुजा संतोष जाधव यांचा समावेश आहे.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक शगौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस हवालदार दिलीप पवार, पोलीस नाईक- काकडे, नितीन गुंडाळे, पोलीस अमंलदार- योगेश यादव, कोळेकर, अडसुळ, सचिन लेकुरवाळे, सरगर यांच्या पथकाने केली.