Solapur Breaking : चितेवर झोपून स्वतःची अंत्ययात्रा काढून मराठा आरक्षणाची मागणी
आरक्षण मागणीची दाहकता झाली आणखी तीव्र
सोलापूर : प्रतिनिधी
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने, गनिमी काव्याने आक्रमक आंदोलने करण्यात येत आहेत. सोलापुरात तळे हिप्परगा येथील एका मराठा समाज बांधवाने जिवंत चितेवर झोपून मराठा आरक्षणाची मागणी केली. राष्ट्रीय छावा पक्षाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी सरणावर झोपून आंदोलन केले आणि राज्य शासनाचा निषेध केला. त्यांच्या या अनोख्या आंदोलन जिल्ह्यात चर्चेचा विषय निघाला आहे.
सोलापुरात तळे हिप्परगा येथील छावा संघटनेच्या वतीने मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडण्यात आले. मनोज जरांगे यांना पाठींबा जाहीर करून राज्य शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्य़ा अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रीय छावा पक्षाचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी अनोखे आंदोलन करताना सरणावर झोपून राज्य शासनाचा निषेध केला. रतिकांत पाटील यांनी स्वतःला चितेवर जिवंत बांधून घेत जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा काढली. या आक्रमक व अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाने महाराष्ट्र शासनाचे मराठा आरक्षण मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत तातडीने मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. चितेवर झोपून स्वतःचीच अंतयात्रा काढण्याचे आंदोलनाने समस्त सोलापूरकरांचे व समाज माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.