Solapur administration | सोलापूर प्रशासन निधी खर्च करण्याच्या “मार्च लगीनघाईत”; विकास कामांना वेग
सोलापूर विकास निधीचा उपयोग करण्यावर प्रशासनाचा पुन्हा दृष्टिक्षेप
सोलापूर -महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपल्यानंतर आता जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व क र्मचारी मार्च एन्डच्या लगीनघाईत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षभरासाठी मंजूर असलेला निधी मार्च अखेर पर्यंत खर्च करण्यासाठी शर्तथि प्रयत्न या कार्यालयात दिसून येत आहेत.
केंद्र, राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयास विकास कामांसाठी निधी देण्यात येतो. याशिवाय जिल्हा नियोजन समिती, सेस या माध्यमातूनही जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेस निधी उपलब्ध होतो.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता असल्याने निधी खर्चात काही महिन्यात अडथळा निर्माण झाला. मात्र आचारसंहिता संपताच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीची तातडीने बैठक आयोजित करुन प्राप्त निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे आदेश शासकीय यंत्रणेस दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेस दोन वर्षापूर्वी प्राप्त झालेला निधी मार्च २०२६ पर्यंत खर्च करणे बंधनकारक आहे. जर या कालावधीत हा निधी खर्च करण्यात आला नाही तर हा निधी राज्य शासनाकडे परत जाणार आहे. त्यामुळे हा निधी प्राधान्याने खर्ची टाकण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे सातत्याने अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीत निधी खर्चाचे नियोजन आखण्यात आले आहे. निधी राज्य शासनाकडे परत गेल्यास त्यास विभागप्रमुख जबाबदार राहणार असल्याची तंबीच यानिमित्ताने संबंधितांना देण्यात आली आहे.