सोहमला चार दिवसांची पोलिस कोठडी
नव्या पीडितेच्या तक्रारीनंतर आणखी गुन्हा नोंद: व्यथा मांडण्यासाठी तीन पीडिता आल्या पुढे
पणजी : कुडचडे येथील वासनाकांड प्रकरणी गुन्हे शाखेसमोर तीन नवीन पीडिता आपली कहाणी सांगण्यासाठी पुढे आल्या आहेत. शुक्रवारी सोहमच्याविरोधात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हे शाखेने एकूण चार गुन्हे नोंद केले असून पाच पीडितांची ओळख पटवली आहे. सोहम नाईकविऊद्ध कुडचडे पोलिसस्थानकात तीन तर गुन्हा शाखेकडे एक तक्रार नोंद झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताच्या निवासस्थानी पंचनामा करून पुरावे गोळा केले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, आरोपीची कार्यपद्धती पीडितेशी मैत्री करून नंतर तिचा गैरफायदा घेण्याची होती. या प्रकरणात ‘निष्पक्ष आणि जलद’ तपास केला जाईल आणि त्याबद्दल कोणतीही शंका राहू नये, असे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी सांगितले. दोन पोलिस निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नव्या तक्रारीवरुन नवा गुन्हा नोंद
संशयित सोहम सुशांत नाईक याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या पीडितांची संख्या वाढत असून, शुक्रवारी त्याच्याविऊद्ध आणखी एक नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून हा चौथा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
बाल न्यायालयाकडून पाच दिवस कोठडी
शुक्रवारी संशयित सोहम नाईक याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हे शाखेने तपासाचा आवाका वाढवण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तथापि, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आणि तपासातील आतापर्यंतच्या प्रगतीची पडताळणी करून संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.