For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोहम नाईकला 4 दिवसांची पोलिस कोठडी

01:24 PM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोहम नाईकला 4 दिवसांची पोलिस कोठडी
Advertisement

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप: सोहमला वाचवण्यासाठी साध्या कलमांचा वापर?

Advertisement

कुडचडे : कुडचडेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याबद्दल म्हादेगाळ-काकोडा येथील सोहम सुशांत नाईक याला रविवारी रात्री अटक करण्यात आली, मात्र जी कलमे त्याच्याविरोधात लागू करण्यात आली आहेत, त्यात दम नसल्याचा मुद्दा उपस्थित करुन कुडचडेच्या लोकांनी काल सोमवारी कुडचडे पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांची भेट घेऊन त्यांना सवाल केला. सोहम नाईक याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी गोवा प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर,फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, आवदा वियेगस, प्रदीप काकोडकर, पुष्कल सावंत व कुडचडे मतदारसंघातील ग्रामस्थ उपस्थित होते.

पोलिसांवर दबाव घालणारे कोण?

Advertisement

सदर चर्चेची माहिती देताना अमित पाटकर यांनी पत्रकारांना सांगितले की कुडचडेत जी घटना रविवारी घडलेली आहे त्यातून दिसून येते की मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रशासन व्यवस्थित काम करत नाही. राज्याचे पोलिस दबावाखाली काम करत आहेत. याचे ताजे उदाहरण कुडचडेत काल संध्याकाळी जनतेला दिसून आलेले आहे. जेव्हा लोक तेथे जमले त्यानंतरच दोन दिवस प्रलंबीत ठेवलेली तक्रार निरीक्षकाने नोंद केली. यातून एक गोष्ट लोकांसमोर उघड झाली पाहिजे की त्यांच्यावर दोन दिवस दबाव घालणारे कोण आहेत? सरकारतील व्यक्ती की पक्षातील व्यक्ती? याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे.

नीलेश काब्राल यांनी भाष्य करावे

कुडचडेत सुऊ असलेल्या याप्रकरणावर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी अजूनपर्यंत कोणतेच भाष्य केलेले नाही. त्यावर प्रश्नचिन्ह असल्याचे सांगून आमदारांनी लवकरात लवकर कृती करणे आवश्यक आहे. कारण सद्या कुडचडेत भाजपचे दोन गट भाजप अ आणि भाजप ब असे झालेले आहेत. ब गट मजबूत असून त्याचीच पोच पक्षाचे अध्यक्ष व उच्च पदाधिकाऱ्यापर्यंत आहे, हे आमदारांनी लक्षात घ्यावे, असे वक्तव्य आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. यावेळी आवदा वियेगस यांनी सांगितले की या घटनेत जे कोणी पीडित आहेत, त्यांनी न घाबरता आम्हाला संपर्क साधावा. कोणतीच खाजगी माहिती उघड्यावर घालण्यात येणार नाही. तसेच आपल्या पुढील आयुष्यात कोणतीच अडचण निर्माण होऊ नये, याचीही जबाबदारी घेण्यात येईल.

दरम्यान या लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम सुशांत नाईक (20, रा. माडेल-काकोडा) याला कुडचडे पोलिसांनी अटक केली असून, केपे येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सोहम नाईक याच्यावर पॉक्सो कायदा कलम 8, 12 आणि 15 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तसेच गोवा बाल हक्क कायदा कलम 8 (2) अन्वये कारवाई सुऊ करण्यात आली आहे. आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले की जी घटना झालेली आहे ती चुकीची आहे. जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्याला ह्या गुह्याबद्दल कडक शिक्षा झाली पाहिजे. कुडचडेत भाजप एकच आहे, पण दुसरा गट कदाचित त्यांचाच असेल जे दोन गट असल्याचे बोलतात.

सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

पाटकर पुढे म्हणाले की या घटनेत मुलांचा समावेश असूनसुद्धा अजूनपर्यंत येथे गोवा राज्य महिला आयोग, गोवा राज्य बाल संरक्षण आयोग, शिक्षण खात्याने लक्ष घातलेले नाही. या व्यतिरिक्त अधीक्षक, उपअधीक्षक यापैकीही कोणीच या प्रकरणी दिसले नाहीत. यातून स्पष्ट झालेले आहे की सरकार हा विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सोहम नाईकवर जी कलमे लावली आहेत, त्यात पॉस्को कलमे लावण्यात आली नव्हती, ती लावण्यात यावी म्हणून आपण मागणी केलेली आहे. मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर संपूर्ण गोवा कुडचडेत आणून मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडू.

Advertisement
Tags :

.