बेंगळूरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर ‘डिजिटल अरेस्ट’ची शिकार
अधिकारी असल्याचे भासवून भामट्यांनी 11.8 कोटींना गंडविले
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशात सायबर गुन्हे प्रकरणांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. डिजिटल अरेस्टद्वारे बेंगळूरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरला 11.8 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्यांनी ही फसवणूक केली आहे. आधारकार्डचा दुरुपयोग मनी लॉन्ड्रिंगसाठी बँक खाते उघडण्यासाठी होत असल्याचे सांगून 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनिअरला धमकावून पैसे उकळण्यात आले.
फसवणुकीला बळी पडलेली व्यक्ती बेंगळूरच्या हेब्बाळ परिसरातील जीकेव्हीके लेआऊट येथील रहिवासी आहे. 25 नोव्हेंबर ते 12 डिसेंबरदरम्यान आपल्याला गंडविण्यात आल्याने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 नोव्हेंबर रोजी बेंगळूरमधील ‘त्या’ सॉफ्टवेअर इंजिनिअरला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणचा अधिकारी बोलत असल्याचे भासवून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या सिमकार्डाचा वापर अनधिकृत जाहिराती आणि जाच देणाऱ्या संदेशांसाठी वापरण्यात आला आहे, असे सांगितले.
नंतर आणखी एका आरोपीने फोन करून सॉफ्टवेअर अभियंत्याला याविषयी गुप्तता राखायची असेल तर व्हर्च्युअल पद्धतीने सहकार्य करावे लागेल. अन्यथा अटक करावी लागेल, असे धमकावले. नंतर स्काईप अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. मुंबई पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या भामट्याने व्हिडिओ कॉल करून कुलाबा येथे तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तुमचे आधारकार्ड वापरून पैसे ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. उद्योजकाने तुमचे आधारकार्ड वापरून 6 कोटी रुपयांचा व्यवहार करण्यासाठी बँक खाते उघडल्याचे सांगितले. आणखी एका पोलीस गणवेशातील व्यक्तीने स्काईपवरून कॉल करून तुमचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात आहे, असे सांगून घाबरविले.
आरोपींनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे बोगस दिशानिर्देश तयार करून त्याच्या आधारे सत्यत्या पडताळणीचे निमित्त करून काही खात्यांमध्ये पैसे पाठविण्यास किंवा कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास सांगितले. अटकेच्या भीतीमुळे त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने विविध बँक खात्यांमधून एकूण 11.8 कोटी रुपये ट्रान्स्फर केले. पुन्हा पुन्हा अधिक पैशांची मागणी झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याला जाणीव झाले. नंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरने बेंगळूर ईशान्य विभागाच्या पोलिसांत तक्रार दाखल केली.