Music For Heart: मधूर संगीत हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर कसे? तज्ज्ञ काय सांगतात वाचा..
साऊंड सिस्टीमचा तीव्र दणदणाट हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे
डॉ. सचिन पाटील
कोल्हापूर : संगीत आणि ध्वनी मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. साऊंड सिस्टीमचा तीव्र दणदणाट आणि मधूरसंगीत यांचे मानवी शरीरावर, विशेषत: हृदयावर वेगवेगळे परिणाम होतात. जिथे तीव्र ध्वनी हृदयासाठी हानिकारक ठरू शकतो, तिथे मधूर संगीत हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण साऊंड सिस्टीमच्या दणदणाटाचे हृदयावरील दुष्परिणाम आणि वीणा, मृदंग, भजन यांसारख्या मधूर संगीताचे सकारात्मक परिणाम जाणून घेऊ.
साऊंड सिस्टीमचा तीव्र दणदणाट हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण यामुळे रक्तदाब, तणाव आणि हृदयविकारांचा धोका वाढतो. याउलट, वीणा, मृदंग आणि भजन यांसारखे मधूर संगीत हृदयाला शांत करते, तणाव कमी करते आणि हृदयाचे कार्य सुधारते.
साऊंड सिस्टीमच्या दणदणाटाचे हृदयावरील दुष्परिणाम
साऊंड सिस्टीमचा वापर विविध समारंभ, उत्सव, आणि मनोरंजनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो. परंतु, यातील तीव्र ध्वनी मानवी शरीरावर, विशेषत: हृदयावर गंभीर परिणाम करू शकतात.
1 रक्तदाबात वाढ : तीव्र ध्वनी (85 डेसिबलपेक्षा जास्त) रक्तदाब वाढवू शकतो. यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. दीर्घकाळ तीव्र ध्वनीच्या संपर्कात राहिल्याने तणाव संप्रेरक (कोर्टीसॉल) आणि अॅड्रेनालिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येतो.
2 हृदयगती वाढणे : साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे हृदयगती अनियमित होऊ शकते. क्वचित वेळा ते बंद सुद्धा पडू शकते. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदय थकते.
3 तणाव आणि चिंता : तीव्र ध्वनीमुळे तणाव आणि चिंता वाढते, ज्यामुळे हृदयावर अपरोक्षपणे परिणाम होतो. दीर्घकाळ तणावामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
4 झोपेच्या समस्या : रात्रीच्या वेळी साऊंड सिस्टीमचा दणदणाट झोपेची गुणवत्ता खराब करतो. अपुरी झोप हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि दीर्घकालीन हृदयविकारांना कारणीभूत ठरू शकते.
5 हृदयविकारांचा धोका : जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दीर्घकाळ ध्वनिप्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने हृदयविकार, हृदयवाहिन्यांचे आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
ओंकार जप ठरतो फायदेशीर :
ओंकार जप (ओमचा उच्चार) केल्याने वैद्यकीयदृष्ट्या अनेक फायदे होतात, हे शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे. ओंकार जपामुळे मेंदूतील अल्फा लहरी सक्रिय होतात, ज्यामुळे शांतता आणि विश्रांती मिळते. तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते.
रक्तदाब नियंत्रणात राहतो. नियमित ओंकार जपामुळे हृदयाचे ठोके संतुलित राहतात आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. ओंकार जप करताना दीर्घ श्वास घेतला जातो, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, ऑक्सिजनचा पुरवठा शरीरात सुधारतो. जपामुळे तणाव संप्रेरक (कॉर्टिसॉल) कमी होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर रोगांशी लढण्यास सक्षम बनते.
ओंकाराच्या कंपनांमुळे पोट आणि आतड्यांवर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. न्यूरॉन्समध्ये सुसंवाद वाढतो, ज्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, बौद्धिक क्षमता सुधारते. झोपण्यापूर्वी ओंकार जप केल्याने मन शांत होते. ओंकाराच्या उच्चारातून निर्माण होणारे कंपन शरीरातील ऊर्जाकेंद्रे (चक्र) संतुलित करतात, ज्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते.
उपाययोजना आणि शिफारशी
ध्वनिप्रदूषण कमी करणे : साऊंड सिस्टीमच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवावे. डेसिबल पातळी 85 पेक्षा कमी ठेवावी. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाविरोधी कायद्यांचे काटेकोर पालन करावे. हृदयविकार असलेल्या व्यक्तीनी तीव्र ध्वनी टाळावा.
मधूर संगीताचा उपयोग : दररोज सुमारे अर्धा तास मधूर संगीत, जसे की वीणा, मृदंग किंवा भजन ऐका. ध्यान आणि योगासोबत मधूर संगीताचा समावेश करावा. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदा होईल. रात्री झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐकल्याने हृदयाला विश्रांती मिळते.
सामाजिक जागरूकता : ध्वनिप्रदूषणाचे हृदयावरील दुष्परिणाम याबाबत जनजागृती करावी. शाळा, महाविद्यालये आणि समारंभात मधूर संगीताला प्रोत्साहन द्यावे.
मधुर संगीताचे हृदयावरील सकारात्मक परिणाम :
मधुर संगीत, जसे की वीणा, मृदंग, भजन, शास्त्रीय संगीत किंवा मंद गतीचे गाणे, मानवी मन आणि हृदयावर सकारात्मक परिणाम करते. हे संगीत हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
हृदयगती आणि रक्तदाब नियंत्रण : मधूर संगीत ऐकल्याने हृदयगती, रक्तदाब नियंत्रित राहतो. संशोधनानुसार, शास्त्रीय संगीत किंवा भजन ऐकल्याने रक्तदाब कमी होतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो. वीणेचे सूर किंवा मृदंगाचा लयबद्ध ताल हृदयाला शांत करतो आणि रक्तप्रवाह सुधारतो.
तणाव कमी होणे : मधूर संगीतामुळे मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे सुखदायी संप्रेरक (हॅप्पी हार्मोन्स) स्त्रवतात, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते. याचा थेट फायदा हृदयाला होतो, कारण तणावमुक्त मन हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे.
झोपेची गुणवत्ता सुधारणे : भजन किंवा शास्त्रीय संगीत ऐकल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. चांगली झोप हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे हृदयाला विश्रांती मिळते.
रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारणे : मधूर संगीत ऐकल्याने रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.