महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी सोएर्द मरिन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेदरलँड्सच्या सोएर्द मरिन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी महिला संघासोबत काम पाहिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिलांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवित इतिहास रचला होता.
51 वर्षीय सोएर्द 2017 ते 2021 या कालावधीत भारतीय महिला संघासमवेत काम पाहिले होते. यावेळी मतायस व्हिला हे अॅनालिटिकल प्रशिक्षक म्हणून त्यांच्यासमवेत काम पाहणार आहेत. व्हिला हे अर्जेन्टिनाचे माजी हॉकीपटू असून 1997 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि 2000 व 2004 यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. सुमारे दोन दशकापासून ते कोचिंगशी निगडित झाले आहेत. भारतीय संघासमवेत काम करण्यासाठी वेन लोम्बार्ड यांचीही नियुक्ती झाली असून ते सायंटिफिक सल्लागार व अॅथलेटिक परफॉर्मन्सचे प्रमुख म्हणून काम पाहतील. रॉडेट यिला व सिआरा यिला हे दोघेही सायंटिफिक सल्लागार म्हणून त्यांना साह्या करतील.
साडेचार वर्षांनंतर भारतात परतल्याने मला खूप आनंद झाला आहे. मी नवीन ऊर्जा व नवा दृष्टिकोन घेऊन संघाच्या विकासास पाठिंबा देण्यासाठी आणि खेळाडूंना जागतिक स्तरावर त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यास मदत करण्यासाठी मी परत आलोय, असे मरिन म्हणाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने जागतिक क्रमवारीत टॉप टेनमध्ये स्थान मिळविले होते. हैदराबादमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक क्वालिफायर ही स्पर्धा त्यांच्यासमोरील पहिले मोठे आव्हान असेल. 8 ते 14 मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. मरिन हे 14 जानेवारी रोजी भारतात दाखल होणार असून बेंगळूरमधील साइ केंद्रावर 19 जानेवारीपासून राष्ट्रीय प्रशिक्षण शिबीर सुरू होईल. ‘सोएर्द मरिन व त्यांच्या संपूर्ण साहायक टीमचे भारतीय हॉकी फॅमिलीमध्ये आम्ही स्वागत करतो,’ असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉकी दिलीप तिर्की म्हणाले.
यावेळी दिलीप तिर्की यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण यांनी या नियुक्त्यांसाठी साह्या केल्याबद्दल आभार व्यक्त केले. स्पर्धेच्यासाठी फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.