चांगल्या साहित्यातून समाज घडतो
प्रा. डॉ. द. तु. पाटील यांचे प्रतिपादन : साठे मराठी प्रबोधिनीचे बाल साहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
मुलांची जडणघडण आणि चांगल्या संस्कारासाठी उत्तम साहित्य प्रत्येकाने वाचले पाहिजे. आदर, प्रेम भावना आणि आपुलकी ही साहित्यातून निर्माण होते. या साहित्याच्या निर्मितीतूनच समाजाची जडणघडण होत असते. साहित्य वाचनाने माणसात विचार निर्माण होतात. या विचारांतून आचार बनतात आणि या आचारांतूनच समाज घडतो. हे सारे बदल एका साहित्यातून होतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. द. तु. पाटील यांनी केले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे 23 वे मराठी बाल साहित्य संमेलन शनिवारी रानकवी रा. धों. महानोर साहित्यनगरी (गोगटे रंगमंदिर) येथे पार पडले. यावेळी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर उद्घाटक एम. एन. राजगोळकर, अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, चित्रा पाटणकर, अरुण पाटणकर, विद्यार्थी प्रतिनिधी समृद्धी पाटील उपस्थित होते.
प्रा. द. तु. पाटील पुढे म्हणाले, निसर्गामध्ये जे बदल होतात त्याचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांची निरीक्षणवृत्ती महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आदींनी साहित्याची निर्मिती केली आहे. चांगले साहित्य निर्माण होण्यासाठी संवेदनशीलता गरजेची आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन झाले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. स्वागत जयंत नार्वेकर यांनी केले. प्रास्ताविक कुशल गोरल यांनी केले. ओळख प्रथमेश चांदीलकर व अथर्व गुरव यांनी करून दिली.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी कथा सादर केल्या. यामध्ये शिवनंदन धनाजी याने ‘एक गुरुजी’, आकांक्षा पावशे हिने ‘रुपी’, मनाली बराटे हिने ‘पाऊस पाणी आभाळवाणी’, मधुरा मुरकुटे हिने ‘नेकलेस’, वैभवी मोरे हिने ‘भाकरी’, अथर्व गुरव याने ‘काळी आई’, समृद्धी पाटील हिने ‘एका गुरुजीची कथा’ या कथातून समाजातील दैनंदिन चित्र मांडले.
संमेलनातील दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक कवितांचे सादरीकरण केले. सुखदा पाटील हिने युद्धामुळे काय समजते?, शिल्पा पाटील-मुलगी, समृद्धी पाटील-जीवनाची पाने, स्नेहल भाष्कळ-मैत्रीण माझी, लावण्या सांबरेकर-खूप पाहिलंय, तनिष्का गोमाणाचे-शेतकरी, तेजस्विनी चांदेकर-आयुष्य, शिवकुमार बसाण-शाळा, प्रथमेश चांदीलकर-लेखणी, श्रुती मोरे-आजी, प्रिया जाधव-धाडस या कविता सादर केल्या.
रानातील कवितांनी आणली संमेलनात रंगत ग्रामीण जीवनाचे दर्शन पारंपरिक गीतांचे सादरीकरण
संमेलनातील तिसऱ्या सत्रात रानातील कवितांमध्ये जात्याभोवती फिरणारी गीते, निसर्ग गीते, निसर्ग दर्शन आणि ग्रामीण जीवन यांचा नाट्याविष्कार सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी ग्रामीण जीवनाचे दर्शन कविता-गीतांतून सादर केले. ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘मन चिंब पावसाळी’, ‘घन ओथंबून येती’ ही निसर्गाचा ठाव घेणारी गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याची व्यथा नाट्यातून सादर केली. यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शेतकरी यांच्यातील संवाद सादर केला. त्याबरोबरच ग्रामीण भागात चावडीवर चालणाऱ्या गोष्टीही कवितेतून दाखवून दिल्या. ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी कवितेच्या माध्यमातून सादर केली. ग्रामीण भागात पूर्वी शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते. यातील विद्यार्थी व पालकांचा संवाद रसिकांसमोर सादर केला.
प्रारंभी विद्यानिकेतन शाळेपासून आकर्षक ग्रंथदिंडी काढण्यात आली. चित्रा पाटणकर व अरुण पाटणकर यांच्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन करण्यात आले. लेझीम पथक यामध्ये सहभागी झाले होते. त्याबरोबरच शिक्षक, डॉक्टर, वकील, शेतकरी आदींच्या वेशभूषेसह विद्यार्थी सहभागी झाले होते. यातून आधुनिक ग्रंथदिंडीचे दर्शन दिसून आले.
कथाकथनमध्ये निवड झालेल्या आणि हस्ताक्षर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरुप होते. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी आणि रसिकश्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शीतल बडमंजी यांनी केले. आभार गजानन सावंत यांनी मानले.