असिफ (राजू) सेठ फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य
आमदार सेठ यांची माहिती
बेळगाव : शहरात गांजा तसेच इतर अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणाईला व्यसनाधिनतेपासून दूर ठेवण्यासाठी तसेच इतर सामाजिक कार्य करण्यासाठी असिफ (राजू) सेठ फौंडेशनची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती आमदार असिफ सेठ यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुण व नागरिकांसाठी व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पोहोचावी, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे यासाठी फौंडेशन सुरू करण्यात येणार आहे. हे फौंडेशन पूर्णत: अराजकीय असल्याने याठिकाणी राजकारण आणले जाणार नाही. कोणताही समाज, भाषा व पक्षाचा व्यक्ती फौंडेशनशी जोडला जाऊ शकतो, असे आमदारांनी सांगितले. सरकारी शाळांमध्ये चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविल्यास विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते. यासाठी फौंडेशनच्या माध्यमातून बेंच तसेच इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट क्लास व शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. युवा पिढीसाठी मॅरेथॉन तसेच व्यसनमुक्तीसाठी विविध शिबिर घेतले जाणार असल्याची माहिती अमन सेठ यांनी दिली.