Online Ragging : Whatsapp वरील शेअरबाजी रॅगिंग, काय असते ऑनलाईन रॅगिंग
काही वेळा त्यांच्याकडून अप्रत्याशित मागण्या देखील केल्या जातात
By : इंद्रजित गडकरी
कोल्हापूर : व्हॉट्सअॅप किंवा तत्सम कोणत्याही सोशल मीडिया ग्रुपवर ज्युनियर विद्यार्थ्यांवर शेरेबाजी करणं,मानसिक दबावात ठेवणं, थट्टा करणं, हे देखील ‘रॅगिंग‘ गुह्याच्या श्रेणीतच येते, असे स्पष्ट आदेश यूजीसीने दिले आहेत. महाविद्यालयांमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. याकडे विद्यापीठ अनुदान आयोगाने आता लक्ष घातले आहे.
शिस्तभंग कारवाईचा इशारा
यूजीसीने देशभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना पत्रक पाठवून स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही स्वरूपाचे रॅगिंग, मग ते प्रत्यक्ष महाविद्यालयाच्या आवारात असो किंवा ऑ नलाईन प्लॅटफॉर्मवर,अशा सर्व प्रकरणांत कडक शिस्तभंग कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
विशेषत: व्हॉट्सअॅप ग्रुपवरून कनिष्ठ विद्यार्थ्यांवर टीका किंवा थट्टा करणारे संदेश पाठवणं,त्यांच्या भावनांशी खेळणं किंवा त्यांना न्यूनगंड निर्माण करणं, हे गंभीर गुन्हा मानून संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद आहे.
काय असते ऑनलाईन रॅगिंग ?
अनेक वेळा वरिष्ठ विद्यार्थी महाविद्यालयात स्वत:चे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करतात. यामध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जोडले जाते. यानंतर त्या ग्रुपवर त्यांच्यावर टीका, शेरेबाजी, हेट स्पीच, जोक किंवा थेट धमक्याही दिल्या जातात. काही वेळा त्यांच्याकडून अप्रत्याशित मागण्या देखील केल्या जातात.
सर्व प्रकार विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करतात. त्यांचा आत्मविश्वास ढासळतो, अभ्यासावर परिणाम होतो आणि कधी कधी ही स्थिती आत्महत्येसारख्या टोकाच्या पावलापर्यंतही जाऊ शकते. यामुळे ऑनलाईन रॅगिंगला गंभीर सामाजिक आणि शैक्षणिक समस्या म्हणून पाहिले जात आहे.
‘झिरो टॉलरन्स‘ धोरण
यूजीसीने या संदर्भात ‘झिरो टॉलरन्स‘ धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले आहे. कोणतीही तडजोड न करता दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाविद्यालयांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आदेश
यूजीसीच्या या नव्या आदेशानंतर आता प्रत्येक महाविद्यालयात ‘रॅगिंगविरोधी समिती‘ कार्यरत असावी, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. ही समिती केवळ ऑफलाइन नव्हे तर ऑनलाइन रॅगिंग प्रकरणांचाही तपास करेल आणि संबंधित विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करेल.
विद्यार्थ्यांना सावध राहण्याचे आवाहन
सध्याच्या काळात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी माध्यम ठरत असले तरी, त्याचा गैरवापर मोठ्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या ऑ नलाईन रॅगिंगचा सामना केल्यास, तत्काळ महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा किंवा यूजीसीच्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुदान रोखण्याचा इशारा
यूजीसीने स्पष्ट केले आहे की, रॅगिंगविरोधी नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरणाऱ्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल. जी महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये रॅगिंगच्या घटना घडतात आणि त्यांना रोखण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरतात, अशा संस्थांवर शैक्षणिक अनुदान थांबविण्यासह अन्य कडक कारवाई केली जाणार आहे.
रॅगिंगविरोधी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे 66 ठराव यूजीसीने तयार केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी होत नसल्यास संस्थेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
युजीसी रँगीगविरोधी हेल्पलाईन- 1800-180-552