फ्रान्समध्ये मुलांसाठी ‘सोशल मीडिया बंदी’
15 वर्षांखालील मुलांसाठी कायदा लागू : संसदेची मंजुरी
वृत्तसंस्था/पॅरिस
फ्रेंच संसदेने 15 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केल्यामुळे फ्रान्स असा कायदा लागू करणारा पहिला युरोपियन युनियन देश ठरला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असून, ते सप्टेंबरमध्ये लागू होणार आहे. डिजिटल नियामक ‘आर्कोम’ या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहणार आहे. तथापि, मुलांच्या वयाची पडताळणी कशी केली जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फ्रान्सच्या पाठोपाठ ब्रिटन, स्पेन, ग्रीस आणि डेन्मार्क हे देशदेखील सोशल मीडियासाठी किमान वय निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. अनेक फ्रेंच पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर शैक्षणिक सामग्री मिळवणे आणि मित्रांशी संपर्क साधण्यावर परिणाम होईल, अशी चिंता काही किशोरवयीन मुलांना भेडसावत आहे. याचदरम्यान, केवळ बंदी पुरेशी नाही; मुलांना डिजिटल जगाच्या सुरक्षित वापराविषयी शिक्षित करणे देखील महत्त्वाचे असल्याचा दावा शिक्षणमंत्री आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केला आहे.