पालकांच्या संमतीनंतरच मुलांना सोशल मीडिया खाते
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याचे मसुदा तयार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आता 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यासाठी त्यांच्या पालकांची संमती घ्यावी लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट (अअ), 2023 अंतर्गत मसुदा नियम तयार केला आहे. हा मसुदा नुकताच जनतेसाठी प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नुकतीच सोशल मीडिया नियमावलीसंबंधी अधिसूचना जारी केली. श्ब्gदन्.ग्ह वर जाऊन लोक आपल्या हरकती नोंदवू शकतात आणि या मसुद्याबाबत सूचनाही देऊ शकतात. 18 फेब्रुवारीपासून लोकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार केला जाईल, असे अधिसूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलांचे खाते सोशल मीडियावर उघडण्यासाठी पालकांची संमती घेण्याची पद्धत या विधेयकाच्या मसुद्यात नमूद करण्यात आली होती. या विधेयकाला दीड वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. मसुद्यासाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, 2023 च्या कलम 40 च्या उप-कलम 1 आणि 2 अंतर्गत केंद्राला दिलेल्या अधिकारांच्या आधारावर नियमांचा मसुदा जारी करण्यात आला आहे. मुलांनी त्यांचा डेटा कोणत्याही स्वरूपात वापरण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य असल्याचेही म्हटले आहे. यासाठी कंपनीला योग्य तांत्रिक आणि संघटनात्मक उपाययोजना कराव्या लागतील. डेटा प्रोसेसिंगमध्ये वैयक्तिक डेटा संरक्षण नियमांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करावी लागेल.