For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या १९ व २० ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधीत सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बचावाच्या दृष्टीने अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन आणि जतनासाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक झाड लावण्याची अभिनव कल्पना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सुपारीची रोपे शाळेत वाटप करण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्याचबरोबर दशावतार नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून दशावतार कलाकारांना प्रोत्साहन देणे, तसेच सह्याद्री फाउंडेशनच्या सदस्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊत व अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी दिली.

Advertisement

सह्याद्री फाउंडेशनची कार्यक्रम नियोजन बैठक संजू परब यांच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी सचिव प्रताप परब, ॲड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुनील खानोलकर, तारकेश सावंत, अशोक सांगेलकर, तसेच विजय चव्हाण, प्रमोद सावंत, हर्षवर्धन धारणकर, सुहास सावंत, श्री. गजानन बांदेकर, विभावरी सुकी, संदीप सुकी, शशिकांत मोरजकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त काही सामाजिक उपक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले.

१९ ऑगस्टला संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे संध्याकाळी ७ वाजता सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कसई, दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान व गौरव सोहळा सायंकाळी ८:३० वाजता केला जाणार आहे. यामध्ये माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांचा विशेष गौरव केला जाणार आहे.

Advertisement

२० ऑगस्टला सह्याद्री पट्ट्यातील शाळांमध्ये वृक्षसंवर्धन व जतन उपक्रमांतर्गत सकाळी १०:३० वाजता कलंबिस्त हायस्कूलमध्ये सुपारीची १०० झाडे विद्यार्थ्यांना वाटप केली जाणार आहेत. दुपारी १२ वाजता आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय, कुणकेरी येथे शंभर सुपारीची झाडे विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.