Ganeshotsav 2025: उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण आणि समाज प्रबोधन करणारे सोल्जर्स तरुण मंडळ
कार्यकर्त्यांनी शाहू विद्यालयाजवळ 106 झाडे लावून त्यांची देखभाल केली
By : गौतमी शिकलगार
कोल्हापूर : पर्यावरण रक्षण आणि सामाजिक विधायक कार्याची परंपरा जोपासणारे मंडळ म्हणजे, जुना बुधवार पेठ परिसरातील तोरस्कर चौकातील सोल्जर्स मंडळ. गेली 36 वर्षे सातत्याने हे मंडळ समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे. 1989 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक भान निर्माण करण्याचा उत्सव व्हावा, यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले.
मंडळाकडून आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, तसेच आपत्तीग्रस्तांना मदत असे उपक्रम राबवले जातात. मंडळाकडून महापुराच्या काळात आंबेवाडी आणि चिखली येथील नागरिकांना मदत पोहोचवली जाते. महिलांसाठी विशेष महाआरतीचे आयोजन, तसेच विसर्जन मिरवणुकीत महिलांना प्राधान्य दिले जाते.
मंडळाने 2010 मध्ये परिसरातील वाढत्या सापांच्या समस्या लक्षात घेऊन ‘साप वाचवा’ हा देखावा सादर केला होता. त्या उपक्रमाला ‘तरुण भारत’कडून विधायक गणेशोत्सव स्पर्धेत समाज प्रबोधनाचा पुरस्कार मिळाला होता. त्याचवर्षी 19 साप जिवंत पकडून त्यांना त्यांच्या अधिवासात सोडले. त्यानंतर या भागात सापांना मारले जात नाही, हा या देखाव्याचा मोठा परिणाम ठरला आहे.
2011 मध्ये ‘स्त्री प्रश्न, स्त्री कर्तृत्व आणि स्त्री जाणिवा’ यावर ‘मदर इंडिया’ रुपातील गणेश साकारला होता. कार्यकर्त्यांनी शाहू विद्यालयाजवळ 106 झाडे लावून त्यांची देखभाल केली. पाहुण्यांच्या सुविधेसाठी स्वत:ची इमारत मोफत उपलब्ध करून दिली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सुरुवातीला हे मंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पहिला आणि महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुसरा हार अर्पण करून राष्ट्रनायक आणि राष्ट्रपित्याप्रती आदर व्यक्त करते.
अभ्यासिका उभारणार
"जुना बुधवार पेठ येथील सोल्जर्स मंडळाची परंपरा अभ्यासिका उभारणार यंदाच्या देखाव्यात दहशतवादापासून विश्वाचे रक्षण करणारा विश्वरक्षक गणपती हा देखावा मंडळाने उभारला आहे. भविष्यात आम्हाला मुलांसाठी अभ्यासिका उभारायची आहे. तसेच केवळ महिलांसाठी खास वाचनालय उभे करायचे आहे."
- उमेश सूर्यवंशी, मंडळाचे कार्यकर्ते
मंडळाचा यावर्षीचा देखावा ‘दहशतवाद’
मंडळाचा यंदा जागतिक समस्या’ या विषयावर आधारित देखावा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी 13 पुस्तकांचे वाचन केले आहे. या देखाव्यात 63 प्रतिमा कार्यकर्त्यांनी स्वत: तयार केल्या आहेत. गणेशोत्सव संपताच पुढील वर्षाचा विषय निश्चित करून वर्षभर अभ्यास, नियोजन आणि अंमलबजावणी केली जाते. सोल्जर मंडळाची वाटचाल केवळ देखाव्यापुरती मर्यादित नसून, समाजामध्ये विधायक कार्य करण्याची परंपरा जोपासणारी आहे. कोल्हापूरपुरतेच नव्हे, तर महाराष्ट्रातही हे मंडळ प्रबोधनाच्या कार्यात अग्रेसर ठरत आहे.