सामाजिक कार्यकर्ते देविदास नाडकर्णी यांचे निधन
मयुर चराटकर
बांदा
डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास अनंत नाडकर्णी (वय 76) यांचे गुरुवारी सकाळी गोवा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. प्रगतशील बागायतदार, सामाजिक कार्यकर्ते ,दानशूर व्यक्तिमत्त्व असे प्रतिष्ठित नाव नाडकर्णी यांचं जिल्ह्यात होते . ते उच्चशिक्षत होते . त्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक शिक्षकाची नोकरी आली होती. मात्र, त्यांनी आपल्या परिवारासाठी त्या नोकरीचा त्याग करून आपल्या भावंडाना चांगले शिक्षण देत उच्च पदापर्यंत जाण्यास प्रोत्साहन दिले. नाडकर्णी यांनी गोरगरीब विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित राहता नये या हेतूने परिसरातील सहकाऱ्यांच्या मदतीने डिंगणे पंचक्रोशी शिक्षण विकास मंडळ संचलित माऊली विद्यामंदिर डोंगरपाल माध्यमिक विद्यालय रुपी शिक्षणाचा वसा सुरू केला होता. शाळा उभी करण्यासाठी त्यांनी खुप मेहनत घेतली होती. अगदी सुरुवातीला विद्यार्थ्यांना पाण्याची गैरसोय होता नये यासाठी त्यांनी स्वतः बैलगाडीतुन विद्यालयाला पाणी पुरविले होते. इमारती बांधण्यासाठी मोठे योगदान दिले होते. आपल्या प्रशालेत चांगले शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. शासनाने जरी शिक्षक नाही दिले तरी ते आपल्या माध्यमातून निवृत्त शिक्षक किंवा खाजगी शिक्षक देऊन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळत असत. गेली तीन चार वर्षं ते अशीच शाळा चालवत आहेत.आपल्या प्रशालेचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चमकला पाहिजे आणि तो चमकला की ते आवर्जून प्रशालेत जाऊन त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत असत. शाळेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते आवर्जून हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करत.ते थोडे विनोदी होते. शैक्षणिक क्षेत्रात किंवा अन्य क्षेत्रात कोणती अडचण निर्माण झाल्यास ते ती गंमतीने घेत व त्यातून मार्ग काढत असत. ते प्रगतशील बागायतदार होते. शेतीत ते नेहमी नवनवीन प्रयोग करत असत. विविध क्षेत्रातील अनेकजण त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ, वहिनी, दोन मुलगे, विवाहित मुली, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. सावंतवाडी माजी प. स. सदस्य सुलभा नाडकर्णी यांचे ते पती, शासकीय ठेकेदार रोहित नाडकर्णी, बागायतदार राजीव नाडकर्णी ,रेश्मा रोहन केरकर यांचे ते वडील होत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व भाजपा विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिक्षण प्रसारक मंडळ बांदा चे संचालक तथा बांदा नवभारतचे माजी मुख्याध्यापक प्रेमानंद नाडकर्णी, बागायतदार नारायण नाडकर्णी, प्रवीण नाडकर्णी यांचे ते भाऊ होत. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गाळेल येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.