For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महागाईचा भडका,पेट्रोल-डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले

11:30 AM May 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
महागाईचा भडका पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले
Advertisement

सावंतवाडी : पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. इंधन दरवाढीचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अलीकडच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली ही चौथी वाढ असून, त्यामुळे वाहतूक खर्च वाढून सर्वच वस्तू महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोलचा दर ११०.४३ रुपये प्रति लिटर होता. मात्र नव्या दरवाढीनंतर पेट्रोलमध्ये प्रतिलिटर २ रुपये ६१ पैशांची वाढ होऊन तो आता ११३.१६ रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरातही २ रुपये १७ पैशांची वाढ झाली असून ९७ रुपयांवर असलेले डिझेल आता ९९.८१ रुपये प्रति लिटर झाले आहे. त्यामुळे डिझेलही आता पेट्रोलप्रमाणे शंभरी पार करण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक क्षेत्रावर मोठा परिणाम होत असून मालवाहतुकीचा खर्च वाढत आहे. परिणामी भाजीपाला, धान्य, दूध, किराणा तसेच बांधकाम साहित्याच्या किमती वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

आधीच कोरोनानंतर आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामान्य नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान, खाद्यतेलाच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी १५० रुपयांना मिळणारे खाद्यतेल आता १७५ रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले असून स्वयंपाकघराचा खर्च वाढला आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत सापडले आहेत. वाहनधारकांनाही इंधन भरणे परवडेनासे झाले आहे. रोजच्या प्रवासासाठी दुचाकी आणि चारचाकी वापरणाऱ्या नोकरदार वर्गाचे महिन्याचे खर्च वाढले आहेत. ग्रामीण भागात शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलवर चालणाऱ्या यंत्रसामग्रीच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गालाही आर्थिक फटका बसत आहे. केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाई आणखी भडकण्याची भीती व्यक्त होत असून नागरिकांकडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.